
दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
वडगाव सावताळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गाजदीपूर आदिवासी वस्तीवरील रस्त्याची समस्या स्वातंत्र्यकाळापासून प्रलंबित आहे. येथील सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजी रोकडे यांनी पारनेर तहसीलदार यांना निवेदन देऊन या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. यावेळी जेष्ठ नेते ज्ञानदेव (माऊली) शिंदे उपस्थित होते. गाजदीपूर ही 2000 हून अधिक लोकसंख्या असलेली वस्ती असून, वडगाव सावताळपासून 6 किमी अंतरावर आहे. रस्त्याचा काही भाग वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने पक्का रस्ता बांधण्यात अडचणी येत आहेत. यामुळे रहिवाशांना आरोग्य, शिक्षण आणि दळणवळणाच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी आता कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास 13 ऑगस्ट 2025 पासून पारनेर तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा शिवाजी रोकडे यांनी दिला आहे. त्यांनी निवेदनात निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. ही परिस्थिती गंभीर असून, आदिवासी बांधवांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत
स्वातंत्र्य काळापासून गाजदीपूर रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे हा प्रश्न मार्गी लावावा अशी स्थानिक ग्रामस्थांचे अनेक दिवसापासून ची मागणी आहे परंतु प्रश्न मार्गी लागत नाही या भागात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतो या विषयावर आता मी उपोषणाला बसत आहे
शिवाजी रोकडे
(चेअरमन, सोसायटी वडगाव सावताळ)