नेप्तीत नवनाथ संगीत ज्ञानयज्ञ कथेला प्रारंभ, भाविकांचा मोठा प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी):
नगर तालुक्यातील नेप्ती येथे श्रीराम नवमी निमित्त श्रीराम सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरासमोर श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त नवनाथ संगीत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे .
यंदा या सोहळ्याचे ३७ वे वर्ष असून श्रीराम विजयग्रंथ व ज्ञानेश्वरी पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.
या सोहळ्याचा शुभारंभ गुरुवर्य औघड पीर मलंगनाथजी महाराज ,गुरुवर्य मस्तनाथजी महाराज व मंडळाचे अध्यक्ष बबन फुले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी प्रतिमा पूजन व ग्रंथ पूजन करून कथेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.

या नवनाथ कथा ज्ञानयज्ञासाठी कृष्ण कृपाकिंत ह.भ.प. डॉ. विकासानंदजी महाराज मिसाळ (संत पंढरी) यांच्या आशीर्वादाने त्यांचे शिष्य ह.भ.प. प्रेमानंदजी महाराज आंबेकर शास्त्री टाकळी ढोकेश्वर हे कथा प्रवक्ते आहेत. कथेची वेळ दररोज रात्री ८ ते ११ अशी ठेवण्यात आली असून, २० मार्च ते २७ मार्च पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेला गायक ह.भ.प. रोहिदास जाधव महाराज (राहुरी), सिंथे सायजर अमोल पानमंद महाराज (खरवंडी), तबला वादक ह.भ.प. सोमनाथ महाराज यशवंते तसेच बासरी वादक बाबासाहेब भोर सर यांची सुरेल साथ लाभत आहे. दररोज सायंकाळी ६ वाजता नेप्ती भजनी मंडळाच्या वतीने हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष बबन फुले, उपाध्यक्ष बाळासाहेब होळकर, माजी सरपंच दिलीप होळकर, माजी उपसरपंच जालिंदर शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, श्रीनिवास महाराज जपकर, बाळासाहेब बेल्हेकर, बबन बेल्हेकर, चंद्रकांत खरमाळे, एकनाथ होळकर, बबन शिंदे, राहुल कांडेकर, पितांबर जवणे, प्रभाकर चहाळ, अशोक गवळी ,विलास जपकर, शिवाजी गाडेकर, दादू दरेकर ,मारुती कावरे, अमोल चौगुले, बाबासाहेब जाधव, विष्णू गुंजाळ, योगेश कुलकर्णी, बंडू रावळे, भानुदास फुले, राजू फुले, राजाराम जपकर, पोपट मोरे, पाराजी होळकर, रावसाहेब इंगोले, सुरेश चत्तर, गुलाब होळकर, दादाभाऊ फुले, रावसाहेब पुंड, बाबासाहेब रावळे, दादू थोरात, दत्तू थोरात, शंकर इंगोले आदींसह श्रीराम सेवा मंडळाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्यानिमित्त २६ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत राम जन्माचे कीर्तन होणार असून, २७ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत काल्याचे कीर्तन होईल. काल्याचे अन्नदाते रावसाहेब भागीनाथ होळकर हे आहेत . ज्ञानेश्वरी पारायणात महिला व पुरुष भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.
या सोहळ्यामुळे संपूर्ण नेप्ती गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मंदिर परिसराची स्वच्छता करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत. श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने परिसरातील सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

