पुणे मेट्रोतील कंत्राटी कामगारांना केंद्रीय वेतनश्रेणी नुसार वेतनवाढ लागू

भारतीय मजदूर संघाच्या पाठपुराव्याला यश; मेट्रो व्यवस्थापनाचा सत्कार
पुणे, दि. १३ जुलै : पुणे मेट्रो रेल प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्रीय वेतनश्रेणीनुसार वेतन लागू करण्याच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश आले असून, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha-Metro) यांनी पुणे मेट्रोतील पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्रीय वेतनश्रेणीनुसार वेतन लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत अंमलबजावणी सुरू केली आहे. या निर्णयामुळे कामगारांच्या वेतनात लक्षणीय वाढ झाली असून, हा निर्णय पुणे मेट्रोतील कंत्राटी कामगारांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
पुणे मेट्रो रेल कामगार संघ रजि 5299 दि 10/09/2025 (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांनी या मागणीसाठी सातत्याने महाराष्ट्र शासन, माननीय कामगार मंत्री तसेच मेट्रो व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला होता. यापूर्वी कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या Shops and Establishments नियमांनुसार वेतन दिले जात होते. मात्र, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेने सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आता केंद्रीय वेतनश्रेणीनुसार वेतन लागू करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पुणे मेट्रो रेल कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. श्रावण हर्डीकर तसेच मानव संसाधन विभागाचे (HR) वरिष्ठ अधिकारी श्री. उत्तमराव बोडके यांचा वृक्षाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यवस्थापनाने कामगारांच्या हितासाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
सत्कार समारंभास पुणे मेट्रो रेल कामगार संघाचे अध्यक्ष राम सुरवसे, जनरल सेक्रेटरी सचिन मेंगाळे, भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, उमेश विश्वाद, कैलास मोरे, सुवर्णा भोसले, विल्यम आणि ऋषीकेश यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण प्रक्रियेत निकिता दंडवते, कैलास मोरे, गौरी साळुंखे, योगिता देवणे, यश निंबाळकर आणि रेखा फडके , रवींद्र वाघोले , राज शेलार , लक्ष्मण गवस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण समन्वय, पाठपुरावा आणि संघटनात्मक कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. संघटनेच्या वतीने त्यांच्या योगदानाबद्दल सर्व कामगारांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी केंद्रीय वेतनश्रेणीची अंमलबजावणी करून त्यांच्या वेतनात ऐतिहासिक वाढ घडवून आणल्याबद्दल महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापनाचे तसेच या मागणीसाठी सातत्यपूर्ण नेतृत्व, मार्गदर्शन आणि संघर्ष करणाऱ्या भारतीय मजदूर संघ व पुणे मेट्रो रेल कामगार संघ यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
संघटनेने स्पष्ट केले की, भविष्यातही पुणे मेट्रोतील सर्व कंत्राटी कामगारांना न्याय्य वेतन, सामाजिक सुरक्षा, सेवा संरक्षण आणि इतर कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघाचा संघर्ष आणि सकारात्मक संवाद यापुढेही अविरत सुरू राहील.


