नेप्ती सोसायटीत जिल्हा बँकेसाठी संजय जपकर यांच्या नावाचा ठराव; आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते जपकर यांचा सन्मान

अहिल्यानगर | प्रतिनिधी
नगर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अति महत्त्वाच्या नेप्ती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी माजी सरपंच संजय आसाराम जपकर यांच्या नावाने संचालक मंडळाने अधिकृत ठराव मंजूर केला आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव, गावाच्या विकासासाठी केलेले कार्य आणि सभासदांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क याची दखल घेत संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याने नेप्तीच्या सहकार क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निर्णयानिमित्त आमदार अक्षयदादा कर्डिले यांच्या हस्ते माजी सरपंच संजय जपकर यांचा फेटा बांधून, शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. सोसायटीचे संचालक, पदाधिकारी, सभासद, सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून नेप्तीच्या सभासदांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना माजी सरपंच संजय जपकर म्हणाले, “नेप्ती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत मोलाची आहे. ही जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि निष्ठेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सभासद, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेन. नेप्ती सोसायटी संचालकाचा विश्वास सार्थ ठरवणार असे प्रतिपादन माजी सरपंच संजय जपकर यांनी केले.
ते पुढे म्हणाले, “ही निवड माझी वैयक्तिक उपलब्धी नसून संपूर्ण नेप्ती गावाने आणि सोसायटीच्या संचालक मंडळाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. आमदार अक्षयदादा कर्डिले यांचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे सहकार्य आणि ग्रामस्थांचे पाठबळ याच्या बळावर जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे आवाज उठविण्याचे काम करेन. विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक सहकार हीच माझ्या कार्याची दिशा असेल.”



