मिंडा कंपनीकडून सुपा येथील न्यू इंग्लिश स्कूल, ला संगणक साहित्य भेट

पारनेर प्रतिनिधी
: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, त्यांच्यात संगणकीय ज्ञान व डिजिटल कौशल्यांचा विकास व्हावा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, सुपा येथे मिंडा कंपनीच्या CSR निधीतून संगणक प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे. विद्यालयाचे प्राचार्य श्री. मंगेश जाधव यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा उपक्रम साकार झाला आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यालयाला २० संगणक, ६ पंखे आणि ३० स्टूल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) मध्ये कौशल्याधारित, अनुभवाधारित आणि तंत्रज्ञानपूरक शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संगणक हाताळण्याची संधी मिळून त्यांची डिजिटल साक्षरता, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि भविष्यातील रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे.
विद्यालयाच्या शैक्षणिक गरजा ओळखून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राचार्य मंगेश जाधव यांनी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधत पाठपुरावा केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शैक्षणिक साधनांचा लाभ मिळावा, या त्यांच्या प्रयत्नांना मिंडा कंपनीच्या CSR सहकार्यामुळे यश मिळाले आहे.
याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींसाठी टेलरिंग प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रशिक्षणातून मुलींना व्यावहारिक ज्ञान, व्यावसायिक कौशल्ये आणि भविष्यात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. संगणकीय शिक्षणाबरोबरच जीवनोपयोगी व रोजगाराभिमुख कौशल्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम NEP 2020 च्या कौशल्यविकासाच्या संकल्पनेला पूरक ठरणार आहे.
या शैक्षणिक उपक्रमासाठी मिंडा कंपनीचे श्री. आलोक कुमार (सीनियर जनरल मॅनेजर), डॉ. राजेंद्र धाईजे (रिजनल हब हेड), श्री. पांडुरंग गब्दुले (रिजनल हब), श्री. मनोज यादव (एच. आर. हेड), श्री. भूपेश माल (जनरल मॅनेजर), श्री. किशोर डुकरे (प्लांट हेड), श्री. सचिन कामथे (सेंटर हेड), श्री. फैरोज जमाल (एच. आर. हेड), श्री. मनोज यादव (बिझनेस एच. आर. हेड) आणि श्री. शिवाजी पानमंद सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
शाळा आणि उद्योगसमूह यांच्या सहकार्यातून ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होत आहेत. प्राचार्य मंगेश जाधव यांच्या पुढाकारातून साकार झालेला हा उपक्रम विद्यालयाच्या शैक्षणिक विकासाला चालना देणारा असून, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा चंद्रकांत दळवी साहेब, सचिव निबाळलकर साहेब यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यातून या उपक्रमाला यश मिळाले
उत्तर विभागाचे चेअरमन आ रोहित पवार, दादाभाऊ कळमकर नवनाथ बोडखे यांनी अभिनंदन केले



