वाकीच्या मयुरी जाधवची इस्रोच्या जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड

प्रतिनिधी/ श्री एस. के. जाधव
: शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC), थुंबा, केरळ शैक्षणिक सहलीसाठीच्या निवड प्रक्रियेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकीची विद्यार्थिनी कुमारी मयुरी ज्ञानेश्वर जाधव हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता सहावीच्या गटातील अकोले तालुका गुणवत्ता निवड यादीमध्ये २०० पैकी १५८ गुण मिळवत तालुक्यात चौथा क्रमांक पटकावत मयुरीची जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने मिळविलेल्या या यशामुळे वाकी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा, केरळ येथे शैक्षणिक सहलीची संधी मिळवून देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत इयत्ता ५ वी, इयत्ता ६ वी आणि इयत्ता ७ वी/८ वी असे तीन स्तर करण्यात आले आहेत. प्रत्येक स्तरातून तालुकास्तरावर प्रथम पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड केली जाते. त्यानंतर जिल्हास्तरीय परीक्षेत प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गटातून एक याप्रमाणे तीन गटांतून तीन विजेत्यांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा, केरळ येथे शैक्षणिक सहलीची संधी मिळणार आहे. त्यामुळे मयुरीच्या पुढील जिल्हास्तरीय परीक्षेतील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाकी सारख्या ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या मयुरी जाधव हिने तालुक्यात चौथा क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरणे ही वाकी शाळेसाठी तसेच परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
याबाबत खिरविरे बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री ज्ञानेश्वर माळवे यांनी म्हटले की “वाकीसारख्या ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेच्या शाळेतून कुमारी मयुरी ज्ञानेश्वर जाधव हिची जिल्हास्तरीय इस्रो परीक्षेसाठी निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे,” असे सांगितले.
मान्हेरे केंद्राचे केंद्रसमन्वयक श्री राम ओहोळ यांनी वाकी शाळेच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीचे कौतुक करत, “वाकी शाळा गुणवत्तेसाठी सातत्याने प्रयत्न करत असून येथील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत घेत आहेत,” असे मत व्यक्त केले.
शालेय व्यवस्थापन समिती वाकीचे अध्यक्ष श्री. राम सगभोर यांनी मयुरीचे कौतुक करताना म्हणाले , “कु. मयुरी जाधव ही मेहनती व हुशार मुलगी असून तिच्या यशाचा आम्हा सर्वांना आनंद वाटतो,”
सरपंच राजाराम झडे, श्री. धिरेंद्र सगभोर, श्री. बालाजी झोले आणि श्री. चंद्रकांत सगभोर या शिक्षणप्रेमी बांधवांनी मयुरीचे अभिनंदन करून तिच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. मयुरीच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांनीही तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत शाळेच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले.
मयुरीने यापूर्वीही विविध शैक्षणिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत तिने ९१ टक्के गुण मिळविले आहेत. तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) मध्ये ३०० पैकी २३२ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता ग्रामीण सर्वसाधारण यादीत यश संपादन केले असून ती शिष्यवृत्तीधारक बनली आहे.
मयुरीच्या या शैक्षणिक प्रगतीमागे तिची मेहनत, सातत्य, अभ्यासाची आवड आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. तिला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकीचे उपक्रमशील शिक्षक तथा वर्गशिक्षक श्री. अर्जुन तळपाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
मयुरीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. भिमा कोकतरे, उपाध्यापिका श्रीमती यशोदा ढगे आणि उपाध्यापक श्री. हेमंत मुठे यांनी तिचे अभिनंदन केले असून जिल्हास्तरीय परीक्षेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडूनही मयुरीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्हास्तरीय परीक्षेतही मयुरीने चमकदार कामगिरी करावी आणि वाकीच्या शाळेला डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा, केरळ येथील शैक्षणिक सहलीचा मान मिळवून द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.



