नेप्तीच्या गायत्री खामकरची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड; ग्रामस्थांकडून सन्मान,

नेप्तीचे नाव गायत्रीने देशपातळीवर चमकविले – प्रा. एकनाथ होले
अहिल्यानगर : प्रतिनिधी –
नगर तालुक्यातील नेप्ती गावची पैलवान कु. गायत्री शिवाजी खामकर हिची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे नेप्ती गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, प्रतिकूलतेवर मात करीत राष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या गायत्रीचे यश परिसरातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे अशी माहिती रामदास फुले यांनी दिली आहे.
गायत्रीचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात नेप्ती ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच संजय जपकर आणि प्रा. एकनाथ होले यांच्या हस्ते गायत्री खामकर हिचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. तसेच तिच्या आई , वडील व आजी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आयोजन प्रा. एकनाथ होले यांनी केले.
गायत्रीची यशोगाथा ही संघर्ष, जिद्द आणि मेहनतीचे प्रतीक आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तिने कुस्तीची आवड जपली. मुलगी असून कुस्ती खेळण्याबाबत समाजातून प्रश्न उपस्थित झाले तरी तिने ध्येय सोडले नाही. तिने सावेडी येथील संभाजी राजे कुस्ती संकुलात कुस्तीचे प्रशिक्षण घेतले असून, प्रशिक्षक राजेंद्र कंबोज तसेच तालमीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी चव्हाण, युवराज चव्हाण, वस्ताद संदीप गायकवाड, नितीन आव्हाड, यश ताकवणे, अजित वाघ, लक्ष्मण धनगर, शंभू यादव यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी प्रा. एकनाथ होले म्हणाले, आजच्या काळात मुलींनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही पुढे येण्याची गरज आहे. मुलगी आहे म्हणून तिच्या स्वप्नांवर मर्यादा घालू नयेत. पालकांनी आपल्या मुलींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. गायत्रीसारख्या खेळाडूंना गावाने पाठबळ दिल्यास भविष्यात नेप्ती गावातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडू शकतात. गायत्रीने राष्ट्रीय स्पर्धेतही उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा. नेप्तीचे नाव गायत्री खामकर हिने देशपातळीवर चमकविले असे प्रतिपादन प्रा. एकनाथ होले यांनी केले.
यावेळी माजी सरपंच संजय जपकर, प्रा. एकनाथ होले, उपसरपंच बंडू जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, जमीर सय्यद, माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, दादू चौगुले, साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, शिवाजी खामकर, जावेद सय्यद, अतुल जपकर, राजू कुलकर्णी, बबन बेल्हेकर, बाळासाहेब होळकर, रोहिदास साळवे, कार्तिक खामकर, ज्ञानेश्वर खामकर, राजू कर्पे, वर्षा खामकर, प्रयागा खामकर, पोपट मोरे, उत्तम फुले, रोहित खामकर, भीमराज खामकर, अर्जुन खामकर, संतोष चहाळ, राहुल गवारे, तेजस खामकर यांच्यासह परिसरातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


