दारिद्र्यरेषा यादीत समावेशासाठी मोफत अपील प्रक्रिया राबविणार !

अकोले प्रतिनिधी
खऱ्या गरीबांचा दारिद्र्य रेषेच्या यादीत समावेश व्हावा या मागणीसाठी जनवादी महिला संघटना जिल्हाभर अपील प्रक्रियेची मोहीम सुरु करत आहे. श्रमिकांचा रेशनचा हक्क वाचविण्यासाठी व शासकीय योजना खऱ्या पात्र लोकांपर्यंत पोहचण्यासाठी संघटना या मोहिमेची सुरुवात करत असल्याचे प्रतिपादन जनवादी महिला संघटनेच्या राज्य अध्यक्ष, प्राची हतीवलेकर यांनी अकोले येथे केले. जनवादी महिला संघटनेच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
अहमदनगर जिल्ह्यातील २०२२ च्या दारिद्र्य रेषेच्या याद्या सदोष असल्याने अनेक खरे गरीब शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोरील Contempt Petition No. 58 of 2011 In Writ petition No. 1779 of 2009 मध्ये अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात १० क्रमांकाच्या उताऱ्यात म्हटल्याप्रमाणे दारिद्र्यरेषेच्या यादीत समावेशासाठी अपील करणे व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची यादी अद्ययावत करणे ही निरंतर प्रक्रिया आहे. ( The process of admission of appeals is continuous and up-gradation of said list is also continuous. )
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची यादी तयार करण्याचे सर्वेक्षण २००२ पूर्वी झाले होते. तदनंतर २०२२ पर्यंत तब्बल २० वर्ष पुढे सर्वेक्षण झालेले नाही. दरम्यानच्या या २० वर्षात परिस्थिती खूप बदलली आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती सुधारल्याने किंवा काहींचा मृत्यू झाल्याने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीतून ही नावे वगळण्याची आवश्यकता आहे. तसेच या यादीनुसार अद्यापही शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत असल्याने या रिक्त जागांवर नवी पात्र नावे समाविष्ट करणे आवश्यक आहे.
शासनाचे या संदर्भातील निकष पाहता अनेक गरीब कुटुंबांचा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत समाविष्ट होणे अपेक्षित आहे. अशा कुटुंबांसाठी शासकीय विहित नमुन्यात अपील अर्ज भरून घेण्याची मोहीम जनवादी महिला संघटना व किसान सभेने सुरु केली आहे. सदरची मोहीम निशुल्क असून गरीब श्रमिकांनी या मोहिमेत सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दारिद्र्य रेषा समावेशासाठी व रेशन हक्क वाचविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मोहिमेस डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, एकनाथ मेंगाळ व नामदेव भांगरे यांनी किसान सभा व माकप च्या वतीने पाठींबा दिला आहे.
श्रमिक जनतेच्या या मोहिमेसाठी जनवादी महिला संघटनेच्या वतीने गावोगावी मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अनिता साबळे, जुबेदा मणियार, आराधना बोऱ्हाडे, सुमन विरनक, रंजना पऱ्हाड, आशा घोलप, आशा लोटे, निर्मला मांगे, नंदा म्हसे, सुनिता पथवे, संगीता साळवे, छाया कुलधरण, चित्रा हासे, अस्मिता कोते, सुनिता गजे, वैशाली राजगुरू