भायगावात नवीन तलाठी कार्यालयाला मंजुरी

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा राज मार्गावरील भायगावमध्ये ग्रामपंचायत कार्यालय वगळता सरकारी कार्यालयाच्या प्रतीक्षेतच असणाऱ्या भायगावला या शासनाच्या नवीन पुनर्रचनेच्या धोरणानुसार मोजे भायगाव व मजलेशहर करिता नवीन तलाठीची निर्मिती करून स्वतंत्र कामगार तलाठी उपलब्ध होणार असल्याचे नुसत्याच शासन आदेशानुसार कळवण्यात आले आहे. पूर्वी तालुक्यातीलच देवटाकळी भायगाव बक्तपुर करिता मोजे देवटाकळी तलाठी सजा होती. या तीनही गावातील शेतकरी व विद्यार्थ्यांसह इतरना लागणाऱ्या शैक्षणिक कागदपत्रांकरिता देवटाकळी कार्यालयात यावे लागत होते. मात्र शासन दिनांक २५/०४/२०२३ च्या आदेशानुसार
राज्यात ३१६५ नवीन तलाठी सजा व ६ तलाठी कार्यालयामध्ये एक महसूल मंडळअधिकारी कार्यालय नवीन धोरणानुसार मान्यता देण्यात आली आहे. तर शासन आदेशानुसार जिल्ह्याकरिता २०२ तलाठी कार्यालय व महसूल मंडळाकरिता ३४ नवीन कार्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. शेवगाव तालुक्यातील ९ तलाठी कार्यालय व २ मंडळअधिकारी कार्यालयांचा समावेश आहे. या शासन निर्णयाचे शेवगाव तालुक्यासह भायगाव व मजलेशहर येथील शेतकऱ्यांनी स्वागतच केले आहे.
मोजे देवटाकळी येथे देवटाकळी बक्तरपुर भायगाव करिता तीनही गावात शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, विधवा व अन्य लोकांना लागणाऱ्या महसूल संदर्भातील कागदपत्रांसाठी देवटाकळी येथील कार्यालयात यावे लागत होते. तीनही गावच्या शेतकरी वर्ग सह इतरांना वेळेत शासकीय सेवा देण्यात नेहमीच तत्परता दाखवत असल्यामुळे कार्यालयात येणारे प्रत्येक जण हे समाधानीच होते. याचा आजही आनंद वाटतो. यापुढील काळात भायगाव मध्येच महसूल संदर्भातील कामे मार्गी लागणार असल्यामुळे वेळेची बचत होणार आहे.
प्रदीप मगर
कामगार तलाठी मोजे देवटाकळी
महाराष्ट्र शासनाच्या नवीन पुनर्रचनेनुसार जिल्ह्यातील २०२ ठिकाणी तलाठी कार्यालय व ३४ ठिकाणी महसूल मंडळाची निर्मिती होत आहे. त्यानुसार भायगाव व मजलेशहर करिता स्वतंत्र कार्यालयाची निर्मितीचा आदेश शासन स्तरावर जाहीर करण्यात आला. या दोन्ही गावच्या मुख्यालय म्हणून भायगाव या ठिकाणी होत असलेल्या कार्यालयाला ग्रामपंचायत स्तरावर पूर्ण सहकार्य केले जाईल. या निर्णयाचे स्वागतच आहे.
सौ.मनीषा राजेंद्र आढाव
सरपंच ग्रामपंचायत भायगाव
यापूर्वी मोजे शहरटाकळी या ठिकाणी तलाठी कार्यालयाला मजलेशहर हे गाव जोडलेले होते. आता नवीन आदेशानुसार भायगाव व मजलेशहर करता स्वतंत्र तलाठी कार्यालय होत आहे. या शासन निर्णयाचे स्वागतच आहे. मजलेशहर व भायगाव करिता आठवड्यातील वार ठरवून देऊन कामकाज व्हावे अशी इच्छा आहे. जेणेकरून स्थानिक लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. कारण मजलेशहरला पुनर्वसित गावेही जोडलेली आहेत.
सौ.विद्या अशोक लोंढे
सरपंच ग्रामपंचायत मजलेशहर