सहकार

गणेश निवडणुकीत सभासदांनी त्यांच्या दहशतीचे झाकण उडवले- आ. बाळासाहेब थोरात

दडपशाहीचा सुपडा साफ होऊन सभासदांना स्वातंत्र्य मिळाले- विवेक कोल्हे

राहता (प्रतिनिधी)-एकेकाळी समृद्ध असलेला राहता तालुका आणि गणेश परिसराला तुम्हाला पूर्वीचे वैभव का मिळवून देता आले नाही. जिरवाजिरवी चे राजकारण बंद करा. सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करा. गणेश निवडणुकीतून सभासदांनी दडपशाहीचे झाकण उडवले असल्याचे प्रतिपादन आणि विजयाचे शिल्पकार काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे तर दडपशाहीचा सुपडा साफ करून सभासदांना स्वातंत्र्य मिळाले असल्याचे प्रतिपादन युवक नेते विवेक भैय्या कोल्हे यांनी केले आहे.

विरभद्र मंदिराच्या समोरील प्रांगणात झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे, आमदार निलेश लंके, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, अरुण पा. कडू, ॲड .नारायणराव कारले ,सौ प्रभावती ताई घोगरे, सुहासराव वाहढणे, करण ससाने, आदींसह राहता तालुक्यातील पक्षांचे पदाधिकारी व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात प्रचार सभेला परवानगी दिली नाही. मात्र आता विजयाची सभा मोठी होत आहे .प्रशासनाने नेहमी निरपेक्ष राहिले पाहिजे . सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला बळी पडू नये.या परिसरात विकासाचे नाही. तर दहशतीचे आणि दडपशाहीचे राजकारण आहे. मात्र गणेश परिसरातील सभासदांनी दडपशाहीचे झाकण आज उडवले आहे .या परिसराला स्वातंत्र्य मिळाले आहे. सभासदांबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ता ही या निवडणुकीत अगदी सक्रिय झाला होता. हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्याचा व सभासदांचा असून परिवर्तनाची सुरुवात झाली आहे.

महसूल खाते आपण सर्वाधिक काळ सांभाळले. मात्र कुणावर केसेस केल्या नाही. दडपशाहीचे राजकारण कधी केले नाही. प्रेमाचे राजकारण आणि चांगला हेतू ठेवून आपण काम करतो. या परिसरात आनंद निर्माण व्हावा हाच आपला उद्देश आहे.

निळवंडे धरणात 10,000 एमटीएफसी पाणी शिल्लक असताना अवघे 200 एमटीएफसी पाणी सोडले . आम्ही आनंदात सहभागी झालो तर पाणी बंद केले. पाणी सुरू राहिले असते तर शेतकऱ्यांच्या आनंदच मिळाला असता विहिरींना पाणी आले असते परंतु त्यांना आनंद पहावत नाही.

यापुढील काळात गणेश कारखाना सर्वांना सोबत घेऊन चांगला चालवण्यासाठी सर्व संचालक मंडळ, सभासदांनी सक्रिय व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले

तर विवेक भैय्या कोल्हे म्हणाले की,आमदार थोरात आणि आमचा यांचा हेतू प्रामाणिक आणि चांगला आहे .या परिसराचा विकास व्हावा पुन्हा समृद्धी नांदावी यासाठी आम्ही राजकारणाचे विचार सोडून एकत्र आलो आहोत. मात्र येथे दडपशाही खूप आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सभासदांनी दडपशाहीला रोखले आहे .त्यांनी जितका त्रास दिला तितकी आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली. दडपशाहीचा सुपडा साफ झाला असूनही मोठे यश स्वर्गीय शंकररावजी कोल्हे व त्या पिढीतील मेहनत घेणाऱ्या सर्व व्यक्तींना आपण समर्पित करतो. त्यांनी जनतेचा कौल मान्य करावा आमदारकी पेक्षा लोकांच्या मनात जागा निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे

तर आमदार निलेश लंके म्हणाले की, दडपशाही विरुद्ध ही निवडणूक होती. आमदार थोरात हे राज्याचे संस्कृत नेतृत्व असून विवेक भैय्या कोल्हे हे जिल्ह्याचे युवा नेतृत्व आहे. परिवर्तनाची सुरुवात राहत्यातून झाली असून शेवट हा नगर दक्षिणमधून होणार आहे .या निवडणुकीने त्यांच्या डोळ्यावरची सत्तेची धुंदी जनतेने उतरवली असून राहतेकरांना खरे स्वातंत्र्य मिळाले आहे

सौ प्रभावती ताई घोगरे म्हणाल्या की, हा विजय दहशतवाद विरुद्धचा आहे. परिवर्तनाची झालेली ही सुरुवात आता आपल्याला आणखी पुढे न्यायची आहे.

तर आ डॉ. तांबे म्हणाले की, गुलामगिरीच्या जोखडातून गणेश चा परिसर मुक्त झाला आहे. यावेळी धनंजय गाडेकर, करण ससाने यांचीही भाषणे झाले

प्रचंड उत्साह आणि भव्य मिरवणूक

श्री गणेश परिवर्तन पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी झाला असून यावेळी राहता शहरातून आमदार थोरात व विवेक भैय्या कोल्हे यांची जोरदार मिरवणूक झाली. वीरभद्र प्रांगणात अत्यंत अलोट गर्दीतून उत्साह पूर्ण वातावरणात झालेल्या या सभेतील उपस्थिती ही लक्षणीय होती ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button