नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास सक्षम – सिताराम खिलारी

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा विस्तार झाला. महात्मा फुले, महर्षी कर्वे, आगरकर यांनी देशाच्या शिक्षणाच्या पायाभरणीत मोलाचे योगदान दिले. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी यांनी केले.
पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर हे होते. संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी पुढे म्हणाले, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था सुरू झाली. या संस्थेने अहमदनगर जिल्ह्यात शिक्षणाचा प्रचार- प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा विस्तार झाला आहे. आतापर्यंत आपल्याला मिळणारे शिक्षण हे पारंपरिक स्वरूपाचे आहे. या शिक्षणाला व्यावसायिकतेची जोड देणे ही काळाची गरज आहे. सध्या वाचनसंस्कृती लोक पावत चालली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान संपादन करण्यासाठी जसे कष्ट घेतले ती प्रेरणा घेऊन आजच्या युवकाने ज्ञानार्जन केलं पाहिजे.
याप्रसंगी प्राचार्य लक्ष्मणराव मतकर म्हणाले, सध्याच्या पारंपरिक शिक्षणापेक्षा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे व्यवसाय व रोजगार क्षमता विकसित करणारे आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच या धोरणाचा हेतू साध्य होईल. म्हणून, महाविद्यालयाने तीन दिवसीय विशेष व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे. या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करावी याचे मार्गदर्शन मिळणार आहे.
या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प डॉ. अनंत हरकल यांनी गुंफले त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदवी अभ्यासक्रमाचे स्वरुप कसे असेल यासंबंधी मार्गदर्शन केले. तर डॉ श्रीहरी पिंगळे यांनी शैक्षणिक धोरणाची बलस्थाने यासंबंधी मार्गदर्शन केले. तर उपप्राचार्य डॉ अनिल आठरे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंतच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा घेतला आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे यासंबंधी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अनिल आठरे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक डॉ तुकाराम थोपटे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रवींद्र देशमुख, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वयक प्रा.नितीन निपुंगे आदी प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.