निघोजच्या लाळगे मळा चारी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य ,
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी –
निघोज मधील ट्रॅक्टर गॅरेजच्या मागील बाजूचा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जवळचा व सुरक्षित असणारा लाळगे मळा चारी रस्त्यावर सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे .
हा रस्ता श्री मुलिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाण्या येण्याकरिता अत्यंत जवळ , कमी वर्दळीचा असून शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित रस्ता असल्याने येथून अनेक विद्यार्थी या रस्त्याचा वापर करतात . हा रस्ता पाटबंधारे विभागाच्या पाटपाणी चारी अंतर्गत असल्याने यावर कोणताही शासकीय निधी मंजूर होत नव्हता . पण दुरुस्ती , मजबूती व पक्का रस्ता करून वापरण्यास पाटबंधारे विभागाने अलीकडच्या काळात परवानगी दिल्याने ग्रामस्थांच्या आशा पैलवित झाल्या आहेत .
शिरूर रस्त्यापासून ट्रॅक्टर गॅरेज च्या मागील बाजू , चारी रस्ता , शासकीय इंदिरा वसाहत , प्रशांत अपार्टमेंट , लाळगे मळा वस्ती, श्री वरदविनायक गणपती मंदीर ते श्री मुलिका देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया पर्यंत चा सव्वा किलो मीटर पर्यंत चा हा काळ्या मातीचा कच्चा रस्ता असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे .
शाळेसाठी हा अत्यंत जवळचा , सुरक्षित रस्ता असल्याने शाळेचे विद्यार्थी पायी किंवा सायकल ने ये जा करतात . चिखलामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या सायकलला चिखल अडकून वा घसरून पडली , अनेक दुचाकी गाड्या ही चिखलामुळे जाम झाल्या व दुचाकी स्वार घसरून पडले . त्यांना दुखापत ही झाले . या रस्त्याने सध्या पायी चालणेही मुश्किल झाले आहे . परिणामी विद्यार्थ्यांना लांबून वळसा घालून निघोज बसस्थानक परिसरातून वर्दळ व रहीदारी च्या मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते . शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस या मुख्य रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते , कधी कधी वाहतूक कोंडी ही होती व विद्यार्थांचे अपघात झाल्याचे घटना घडल्या आहेत . या रस्त्याच्या कडेला अनेक शेतकऱ्यां ची शेती असल्याने त्यांना शेती कामासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो , परिणामी सध्या या रस्त्याने प्रवासी करणे , जोखमीचे झाले आहे .
निघोज मध्ये राज्यातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांशी व आमदार , खासदारां शी थेट संपर्क व संबंध असणारे कार्यकर्ते आहेत . येथील मोठे मोठे शासकीय अधिकारी ही राज्याला दिशा देण्याचे काम करतात . देशाला स्वातंत्र्य मिळवून ही ७५ वर्षापेक्षा काळ लोटून गेला , पण ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा रस्ता मात्र पारतंत्रच अनुभवतो . हा रस्ता होणे , ही काळाची च नव्हे, तर शाळेची गरज आहे .