पत्रकारिता क्षेत्रात युवा वर्गास अनेक संधी-पत्रकार सुरेश खोसे पाटील

अळकुटी महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन
दत्ता ठुबे
पारनेर – पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आजच्या आधुनिक युगात पत्रकारितेचे बहुआयामी स्वरूप आपणास पहावयास मिळते. प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया ही पत्रकारितेची महत्त्वाची अंग आहेत. आज अनेक दूरदर्शन वाहिन्या व वृत्तपत्रांना निवेदक, वार्ताहर यांची मोठ्या प्रमाणावर निकड भासत आहे.आजच्या युवा वर्गाने पत्रकारितेतील संधी ओळखून जर्नालिझम,मास मीडिया यांसारखे विविध कोर्स करून पत्रकारिता क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे.समाजकारण,राजकारण,धर्मकारण,प्रशासन,कायदा सुव्यवस्था आणि इतर क्षेत्रात पत्रकार बांधवांना विशेष मान दिला जातो कारण ते प्रवाही पत्रकारिता करतात. म्हणूनच आजच्या युवावर्गाने या पत्रकारितेला व्यवसायाची एक संधी म्हणून पहावे. एकूणच युवावर्गास पत्रकारिता क्षेत्रात अनेक संधी आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हा सचिव तथा दैनिक पारनेर समर्थचे संस्थापक , संपादक सुरेश खोसे पाटील यांनी केले.
पद्मभूषण लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे,अळकुटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील शिरापूर येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने ‘ पत्रकारिता आणि रोजगाराच्या संधी ‘ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पत्रकार सुरेश खोसे पाटील यांनी १९९३ पासून पत्रकारिता करतानाचे आलेले अनुभव सांगितले व पत्रकारितेचे महत्व विशद केले.

पत्रकारिता इतिहास विभागप्रमुख प्रा.अर्जुन चाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून म्हणाले की पत्रकार सुरेश खोसे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी पत्रकारिता क्षेत्रात आपले नाव कमविले पाहिजे जेणेकरून आपल्या कुटुंबाबरोबरच गावाचे ही नाव रोशन होते असे म्हटले.प्राचार्या डॉ.कुंदा कवडे यांनी तरुणांनी दररोज दैनिक वृत्तपत्र वाचली पाहिजेत.त्यातील आशय समजावून घेत बौद्धिक विकास साध्य केला पाहिजे,असे म्हणत पत्रकारिता क्षेत्रातील तरुण वर्गाची भूमिका प्रतिपादित केली तर प्रास्ताविक करताना प्रा.विशाल रोकडे यांनी पत्रकार सुरेश खोसे यांचा परिचय करून देताना त्यांचे पत्रकारितेतील योगदानाबद्दलाचा आवर्जून उल्लेख करून तालुक्यातील पत्रकारांमध्ये पत्रकारितेच्या शिक्षणाबद्दल ही माहिती विशद केली.
या कार्यक्रमाप्रसंगी नितीन शेळके,राजुकाका देशपांडे,कार्यक्रम अधिकारी पोपट सुंबरे,सहकार्यक्रम अधिकारी प्रा.दशरथ पानमंद,प्रा.सुषमा करकंडे,प्रा.सुप्रिया पारखे, प्रा.राजाराम गोरडे,डेअरी डिप्लोमा प्राचार्य प्रशांत लोखंडे,प्रा.तांबे,राहुल बोरुडे,मनोहर कनिंगध्वज आणि प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर कर्मचारी व शिबिरार्थी विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.विशाल रोकडे, सूत्रसंचालन प्रा.स्वाती फापाळे यांनी केले तर आभार कु. गायत्री गाडगे यांनी मानले.