संगमनेर तालुक्यातील अनाधिकृत फ्लेक्स तातडीने काढा -शिवसेनेची मागणी

अन्यथा फ्लेक्स फाडो आंदोलन करणार -अमर कातारी
संगमनेर (प्रतिनिधी)–संगमनेर शहर व तालुक्यामध्ये मागील दोन ते अडीच महिन्यांपासून काही राजकीय पक्षांचे अनाधिकृत व शासकीय वेळेच्या पेक्षा जास्त काळ अभिनंदन फ्लेक्स लागलेली आहेत. हे सर्व नियमबाह्य असून जास्त दिवस फ्लेक्स राहिल्याने काही फाडतोड झाली तर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते यामुळे गटविकास अधिकारी यांनी तातडीने ग्रामसेवकांना सार्वजनिक जागेतील सर्व अनाधिकृत फ्लेक्स काढण्याच्या सूचना द्याव्यात अन्यथा 27 जानेवारी नंतर फ्लेक्स फाडो आंदोलन उभारले जाईल असा इशारा शिवसेनेचे अमर कातारी यांनी दिला आहे.
पंचायत समिती कार्यालय येथे शिवसेनेचे अमर कातारी यांनी गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना याबाबतचे निवेदन दिले यावेळी समवेत अमित चव्हाण, प्रशांत खजुरे ,राजू सातपुते ,इम्तियाज शेख ,फैजल सय्यद, अमोल डुकरे ,दीपक साळुंखे
आदी मान्यवर होते.
या निवेदनात असे म्हटले आहे की , मागील तीन महिन्यापासून विविध गावांमध्ये काही राजकीय पक्षांचे फ्लेक्स लागलेले आहेत. मात्र हे सर्व फ्लेक्स विनापरवानगीने अनधिकृत आहेत. त्यांची नगरपालिका अथवा ग्रामपंचायतकडे कोणतीही अधिकृत नोंदणी नाही आणि ते वेळेपेक्षा जास्त काळ सुद्धा लागले गेले आहेत त्यामुळे गावचे विद्रूपीकरण झाले आहे याबाबत संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाने ही आंदोलन केले होते मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे शिवसेनेने नगरपरिषद व पंचायत समिती यांना याबाबत सूचनाही केल्या होत्या यानुसार नगर परिषदेने तातडीने कार्यवाही करून सर्व अनाधिकृत फ्लेक्स काढले यामुळे संगमनेर सुंदर दिसू लागले
मात्र ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवकांमध्ये असलेल्या उदासीनतेमुळे किंवा त्यांच्या लागेबंदामुळे सर्व फ्लेक्स तसेच आहेत. जास्त दिवस झाल्याने हे फ्लेक्स खराब होऊ शकतात आणि राजकीय तंटा निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक ग्रामसेवकाने आपल्या हद्दीतील अनाधिकृत फ्लेक्स तातडीने काढून घेतले पाहिजे अन्यथा 26 जानेवारी च्या नंतर प्रत्येक गावात शिवसेनेचे पदाधिकारी गावनिहाय दौरा करणार असून त्यावेळी सर्व फ्लेक्स चे शूटिंग काढून ते गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले जाणार आहे आणि यानंतर त्या गावांमध्ये शिवसेनेकडून फ्लेक्स फाडो आंदोलन होणार आहे.
यानंतर जर काही तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीला पूर्णतः ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी तसेच या विभागाचे सर्व अधिकारी जबाबदार राहणार आहेत.
म्हणून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन असल्याने अनेक गावांमध्ये ग्रामसभा आहेत तत्पूर्वी ही सर्व फ्लेक्स काढले जावेत व नव्याने लागणाऱ्या बोर्ड साठी सुद्धा शासकीय नियमावली लागू करावी अशी मागणी अमर कातरी यांनी केली आहे.
या नियोजन नंतर याबाबत तातडीने कार्यवाही होऊन असे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिली आहे.