प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली पद्मश्री बीज मातेची भेट.

अकोले प्रतिनिधी –
प्रहार संघटनेचे अध्यक्ष तसेच लोकप्रिय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी कोंभाळणे(ता अकोले) येथे जाऊन पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांची भेट घेतली.
अनेक दिवसांपासून राहीबाई यांना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आज त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात प्रत्यक्ष कोंभाळणे गावी जाऊन पद्मश्री राहीबाई यांची भेट घेतली. पद्मश्री राहीबाई यांनी आमदार बच्चू कडू यांचे औक्षण करून पारंपारिक पद्धतीने स्वागत केले.
गावरान बियाण्यांचा संग्रह व बीजबँक प्रकल्प यांची सविस्तर माहिती बच्चू कडू यांनी राहीबाईंकडून घेतली. राहीबाई यांनी बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मदतीने देशातील पहिली गावरान बियाणे बँक उभारली होती. नामशेष होत चाललेले ५२ पिकांचे 114 वाण त्यांनी गावातील महिला शेतकऱ्यांच्या मदतीने जतन केलेले आहेत. याप्रसंगी या सर्व बियाण्यांचे तसेच औषधी वनस्पतींचे प्रदर्शन त्यांनी भरवले होते.

आमदार बच्चू कडू यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सविस्तर माहिती करून घेतली. राहीबाई यांच्याशी अत्यंत मनमोकळ्या गप्पा त्यांनी केल्या. बीज संवर्धनाचे कार्य करताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. कोंभाळणे हे डोंगरावर वसलेले गाव असल्याने पाण्याची गंभीर समस्या येथे निर्माण होते. शेती व दैनंदिन वापरासाठी पाण्याची गंभीर समस्या असल्याचे त्यांनी बच्चू कडू यांच्या लक्षात आणून दिले.
शेतकऱ्यांसाठी गावरान बियाणे मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी प्रहार संघटने कडून व शासनाकडे पाठपुरावा करून पाणी समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मदत केली जाईल असे आश्वासन आमदार बच्चू कडू यांनी बीज माता राहीबाई यांना दिले. भेटी दरम्यान बच्चू कडू यांनी बीज बँकेतील संग्रहित केलेल्या बियाण्यांची सखोल माहिती राहीबाई आणि त्यांच्या कुटुंबाकडून करून घेतली. भेटी दरम्यान अनेक पारंपारिक आणि नष्ट होत चाललेल्या संस्कृतीबद्दल सुद्धा दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली.
