इतर

नेप्ती सोसायटीच्या प्रगतीत खुंटाळे यांचे योगदान – मा. सरपंच संजय जपकर, .

नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने सचिव खुंटाळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

अहिल्यानगर, प्रतिनिधी :
नगर तालुक्यातील नेप्ती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव राजेंद्र खुंटाळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. अनेक वर्षे प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने व सभासदांच्या हिताला प्राधान्य देत केलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले व अंबादास जपकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन खुंटाळे यांचा सन्मान करण्यात आला.


सोसायटीची आर्थिक शिस्त, सभासदांचा विश्वास, कर्जवाटपातील पारदर्शकता आणि विकासाभिमुख निर्णय यामुळे नेप्ती सेवा सोसायटीला वेगळी ओळख मिळाली असून त्यामध्ये खुंटाळे यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. सचिव म्हणून काम करताना राजेंद्र खुंटाळे यांनी केवळ कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर सभासदांचा विश्वास जपत सेवा सोसायटीला सक्षम आणि विश्वासार्ह संस्था म्हणून उभी करण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या कामात प्रामाणिकपणा, शिस्त, संयम आणि पारदर्शकता या गुणांचे दर्शन नेहमीच घडले. त्यामुळेच सोसायटीच्या प्रत्येक निर्णयावर सभासदांनी विश्वास ठेवला. नेप्ती सेवा सोसायटीच्या प्रगतीत राजेंद्र खुटाळे यांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन माजी सरपंच संजय जपकर यांनी केले.
ते पुढे म्हणाले, “आज खुंटाळे सेवानिवृत्त होत असले तरी त्यांनी निर्माण केलेली कार्यसंस्कृती आणि विकासाचा वारसा पुढील पिढीला प्रेरणा देणारा आहे. कोणतीही संस्था केवळ इमारतींमुळे मोठी होत नाही, तर त्यामागे निष्ठेने काम करणारी माणसे असतात. राजेंद्र खुंटाळे हे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या सेवेमुळे नेप्ती सेवा सोसायटीने प्रगतीची अनेक टप्पे गाठले असून त्यांचे योगदान ग्रामस्थ कधीही विसरणार नाहीत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो.”
सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “राजेंद्र खुंटाळे यांनी आपल्या सेवाकाळात सभासदांना आपलेपणाने मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येक काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पूर्ण केले. त्यांच्या कार्यामुळे सोसायटीची विश्वासार्हता अधिक वाढली. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा अनुभव समाजाच्या विकासासाठी उपयोगी पडेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.”


सत्काराला उत्तर देताना राजेंद्र खुंटाळे यांनी ग्रामस्थ, सभासद, संचालक मंडळ आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या सेवाकाळात सर्वांच्या विश्वासामुळेच जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडता आल्या, असे सांगत त्यांनी मिळालेला सन्मान हा आयुष्यभर जपून ठेवणारी अमूल्य आठवण असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक गजेंद्र क्षीरसागर , माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले , ग्रामसेवक प्रवीण पानसंबळ ,माजी उपसरपंच बाबासाहेब होळकर , दादू चौगुले, बंडू जपकर ,चेअरमन सुरेंद्र होळकर, व्हाईस चेअरमन सादिक पवार, संचालक जालिंदर शिंदे, उमर सय्यद, अंबादास जपकर, राजेंद्र जपकर, सुरेश कदम, राजाराम जपकर, भाऊसाहेब होळकर, अशोक जपकर, मुक्ता कांडेकर, विलास जपकर, मच्छिंद्र होळकर, भास्कर जपकर, शांताबाई जपकर, जमीर सय्यद अमोल चौगुले माजी सचिव अशोक होळकर ,रामराव कांडेकर यांच्यासह ग्रामस्थ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण होते. उपस्थितांनी राजेंद्र खुंटाळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्याचा आदर्श भावी पिढीने घ्यावा, अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. . . . . .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button