इतर

शेणित परिसरातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

क्रांती प्रतिष्ठान व शेणित नोकरदार वर्गाचा पुढाकार

प्रतिनिधी / एस. के. जाधव दि. 6


क्रांती प्रतिष्ठान व नोकरदार वर्ग शेणीत यांच्या वतीने राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय ठोकळवाडी, जि.प. प्राथमिक शाळा ठोकळवाडी, जि.प. प्राथमिक शाळा शेणीत गावठा, जि.प. प्राथमिक शाळा डामसेवाडी येथील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .


ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शेणीत गावातील कर्मचारी संघाने हा स्तुत्य उपक्रम राबवला. गरीब विद्यार्थी शिकून मोठे व्हावेत, त्यांच्या शिक्षणात थोडा मदतीचा हातभार लागावा म्हणून क्रांती प्रतिष्ठान शेणित, श्री.नागेश धोंगे , श्री.प्रदीप लांघी, श्री.रामदास शिंदे, श्री.सुनिल लांघी,श्री. विठ्ठल तळपे, श्री.गौतम लोहकरे, श्री. भाऊराव लांघी, श्री.अरुण पवार, श्री. दीपक डामसे, श्री. रमेश भांगरे, श्री. राजाराम ठोकळ, श्री. गणपत लांघी, श्री. सिताराम धोंगडे, श्री.दशरथ धोंगे,श्री.पंढरीनाथ धोंगे यांच्या आर्थिक योगदानातून ९० हजार रुपये किंमतीचे गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. क्रांती प्रतिष्ठांच्या सर्व पदाधिकारी यांच्या आर्थिक सहयोगातून विद्यालयास सातत्याने भरीव मदत मिळत असते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ.दीपक डामसे म्हणाले, ” मी गरिबीतून शिक्षण घेतले, कृषी विद्यापीठामध्ये वेगवेगळे वाण विकसित करून संशोधनाचा मानकरी ठरलो, लहानातून मोठे होता येते. कष्टाची तयारी ठेवा जिद्दीने अभ्यास करून जास्त मार्क मिळवा.”


सातारा येथे प्राध्यापक असणारे श्री सिताराम धोंगडे म्हणाले,” तुम्हाला मदत करताना खरोखर आनंद होतोय. परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. इगतपुरी – संगमनेर – नाशिक या ठिकाणी शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. तिथे जाऊन शिक्षण घेण्यासाठी जास्तीत जास्त टक्केवारी मिळवा. मी नोकरीला रुजू होण्यापूर्वी दोन वर्ष या विद्यालयात शिकविले. जेव्हा नोकरीसाठी दूर जावे लागते तेव्हा तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. उच्च स्तरावर जाण्यासाठी आपल्याकडे गुणवत्ता असावी. ज्या वर्गात असाल तिथे पाया पक्का करा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा, आपले व्यक्तिमत्व दर्जेदार राखा, देशाची, समाजाची सेवा करा.”
यावेळी श्री अरुण पवार सर म्हणाले, “आपल्या गावाला एक क्रांतिकारी इतिहास आहे. ही क्रांतिवीरांची कर्मभूमी आहे. आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव देशभर गाजते आहे. या मातीत जन्माला येणे भाग्याची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनो तुमच्यासमोर मंचावरील सारे आदर्श आहेत. त्या काळात आमच्या समोर असे आदर्श नव्हते, सातवीपर्यंत बसायला बेंच नव्हते, मदत देणारे कोणी नव्हते, शेती करणारे आई-वडील त्यांनी दिलेल्या आधारावर पुढे गेलो, मोठे झालो, शिक्षण पूर्ण केले. आता गाडी, बंगला आहे. मुले मोठ्या शाळा – कॉलेजात शिक्षण घेतात. पण गावची ओढ सुटत नाही मन गावाकडे लागून राहते. पी.एच. डी. झालेले डॉ.दिपक डामसे तज्ञ म्हणून देशात गौरवले जातात.


नागपूर चे कार्यकारी अभियंता म्हणून श्री अशोक धोंगे यांची ओळख आहे.
माजी गटशिक्षणाधिकारी म्हणून एम एम लांघी साहेबांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे.
नेहमी मोठी स्वप्न पहा, ती प्रत्यक्षात उतरवा. आमचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी असेल, चांगली शाळा उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. थोड्याच दिवसात शाळेला इमारत असेल हा आमचा निर्धार आहे. पण तुम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर, यू.पी.एस.सी, एम,पी.एस.सी. करून मोठे अधिकारी बना. थोरा मोठ्यांचा आदर्श घ्या.”
यावेळी बोलताना रमेश आवड सर म्हणाले,” शेणीत हा दुर्गम भाग आहे. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे. जेव्हा मोबाईलचा जन्म नव्हता, तेव्हा आम्ही शिक्षण घेतले. आदर्श डोळ्यासमोर उभे केले. वड,पिंपळ दगडात खडकात प्रचंड मोठे होतात. आपणही दुर्गम भागातून मोठे व्हायचे आहे. मोठे झाल्यानंतर कामाचा रुबाब मोठाच असतो. तुमच्यासमोर सर्व दृष्टीने हाताला धरून पुढे नेणारे आहेत. शिक्षणासाठी कष्ट घ्यावेत, स्वतःचे भविष्य उज्वल करावे.”
श्री भाऊराव लांघी, सरपंच श्री गोविंद करवंदे, श्री एम एम लांघी साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नागेश धोंगे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नागेश धोंगे, श्री दीपक डामसे, श्री सिताराम धोंगडे, श्री राजाराम ठोकळ, श्री रमेश भांगरे, श्री गणपत लांघी, श्री सुनील लांघी, श्री रामदास शिंदे, श्री रमेश धोंगडे, श्री अरुण पवार, श्री प्रदीप लांघी, कुमारी काव्या लांघी, श्री पंढरीनाथ धोंगे, श्री भाऊराव लांघी, श्री गौतम लोहकरे, श्री विठ्ठल तळपे, श्री रमेश आव्हाड, श्री अमोल लांघी.श्री दशरथ धोंगे, संस्थेचे अध्यक्ष श्री एम एम लांघी, खजिनदार श्री मुरलीधर तळपे, जि. प. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री लालू धोंगडे, श्री सुधाकर भांगरे, श्री ज्ञानेश्वर तळपे, श्री तुकाराम बेनके, महादर्पनचे प्रतिनिधी श्री संतु जाधव, श्री विजय बडे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर सर यांनी सूत्रसंचलन केले व श्री घनश्याम नवले सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button