इतर

नेप्तीत दक्षिणमुखी हनुमान प्रकट दिनानिमित्त भंडारा उत्साहात,

महापूजा व प्रवचनाने परिसर भक्तीमय,

झरेकर महाराजांच्या प्रवचन सेवेने भाविक भारावले

अहिल्यानगर: प्रतिनिधी –

नगर तालुक्यातील नेप्ती येथील पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, असलेल्या कृपासिंधू श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान प्रकटदिनाचा ४ था प्रगटदिन सोहळा अत्यंत भक्तिमय, उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सेवेकऱ्यांच्या हस्ते हनुमानाची विधीवत पूजा करून अभिषेक घालण्यात आला. यावेळी “बजरंग बली की जय, पवनसुत हनुमान की जय, जय श्रीराम” च्या अखंड जयघोषाने आसमंत दणाणून गेला होता. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

मंदिराला यावेळी झेंडू, गुलाब, मोगरा, गुलछडी, शेवंतीच्या फुलांची आकर्षक व विलोभनीय सजावट करण्यात आली होती. मंदिराला रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, लाल-केशरी पडदे, आंब्याच्या पानांचे तोरण, भगवे ध्वज व फुलांचे हार लावण्यात आले होते.

या सोहळ्याचे मुख्य व विशेष आकर्षण म्हणजे सायंकाळी ७ ते ८ या वेळेत झालेले ह.भ.प. राजाभाऊ झरेकर महाराज, सद्गुरू माऊली समाधी आश्रम, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर यांचे विशेष प्रवचन. “निस्वार्थ निरपेक्ष सेवा हीच खरी हनुमान सेवा आहे” या विषयावर महाराजांनी अत्यंत ओघवत्या, रसाळ व अभ्यासपूर्ण शैलीत निरूपण केले. महाराज म्हणाले, “दक्षिणमुखी हनुमान हा संकटमोचन, विघ्नहर्ता, संकटातून तारणारा देव आहे. जो भक्त निस्वार्थ भावनेने, कोणतीही अपेक्षा न ठेवता, अहंकार सोडून त्याची सेवा करतो, त्याच्या पाठीशी हनुमान सदैव उभा राहतो. हनुमान हा निष्ठा, सेवा, शक्ती आणि ब्रह्मचर्य यांचे प्रतीक आहे. आजच्या तरुणांनी त्याच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी.” जवळपास एक तास चाललेल्या या प्रवचनाने उपस्थित भाविक भारावून गेले, मंत्रमुग्ध झाले होते.

प्रवचनानंतर रात्री महाआरती झाली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा म्हणजेच भंडाऱ्याचा लाभ घेतला.
कृपासिंधू श्री दक्षिणमुखी हनुमान महाराज यांच्या ४ वर्षीच्या प्रगट दिनानिमित्त ह.भ.प. राजाभाऊ झरेकर महाराज यांनी कोणतेही मानधन न घेता केवळ सेवा भावनेने निस्वार्थ व निरपेक्ष प्रवचन सेवा केल्याबद्दल श्री दक्षिणमुखी हनुमान सेवा मंडळ व नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी हनुमान सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सोहळा शांतता, शिस्त व उत्साहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button