इतर

नेप्तीत तुळजाभवानीच्या पालखीचे उत्साहात स्वागत;

हजारो भाविकांनी घेतले दर्शन,

आई नेप्तीत सुख-समृद्धी नांदू दे – वस्ताद बाबासाहेब पवार

अहिल्यानगर : प्रतिनिधी

-नगर तालुक्यातील नेप्ती येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र पालखीचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. संबळाचा कडकडाट, ‘आई राजा उदो-उदो’चा जयघोष, हळद-कुंकवाची उधळण आणि फुलांच्या वर्षावाने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. पालखीच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील महिला भगिनींनी औक्षण करून पालखीचे स्वागत केले
ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गावातील प्रमुख मार्गांवरून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. घरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढून, ग्रामस्थांनी आई तुळजाभवानीचे भक्तिभावाने स्वागत केले. गावातील तुळजाभवानी मंदिरात पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. हजारो भाविकांनी आईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. ज्येष्ठ नेते वस्ताद बाबासाहेब पवार यांच्या हस्ते पालखीची विधिवत पूजा करण्यात आली, तर गोंधळी पोपट जाधव, राहुल गवारे,यांच्या हस्ते आरती करण्यात आली. पालखीच्या आगमनामुळे गावात धार्मिक उत्साहाबरोबरच सामाजिक एकोप्याचे आणि सामूहिक श्रद्धेचे दर्शन घडले.

यावेळी बोलताना वस्ताद बाबासाहेब पवार म्हणाले, “आई तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारी माता म्हणून तिची ख्याती आहे. आईच्या दर्शनाने मनाला समाधान, नवी ऊर्जा आणि संकटांशी सामना करण्याचे बळ मिळते. आज आई तुळजाभवानीची पालखी आपल्या नेप्ती गावात दाखल झाली, हा प्रत्येक ग्रामस्थासाठी आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या पवित्र पालखीच्या आगमनामुळे गावातील भक्तिमय वातावरण अधिकच प्रसन्न झाले आहे. आईच्या चरणी प्रार्थना आहे की, नेप्ती गावातील प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती नांदावी. गावातील शेतकरी सुखी व्हावा, आणि सर्वांच्या जीवनात आनंदाचे दिवस यावेत. आई तुळजाभवानीने सर्वांचे दुःख दूर करून गावावर आपली कृपादृष्टी कायम ठेवावी,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पवार पुढे म्हणाले, “धार्मिक परंपरा आणि उत्सव हे केवळ पूजाअर्चेपुरते मर्यादित नसून, समाजाला एकत्र आणण्याचे आणि माणसामाणसांतील नाते अधिक दृढ करण्याचे प्रभावी माध्यम आहे. आईच्या पालखीच्या स्वागतासाठी गावातील सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन दाखवलेला उत्साह कौतुकास्पद आहे. अशा धार्मिक सोहळ्यांमुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची, परंपरांची आणि श्रद्धेची ओळख होते. गावात एकोपा, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना कायम राहिली, तर गावाच्या सर्वांगीण विकासालाही बळ मिळते. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने नेप्ती गावात सुख-समृद्धी नांदू दे असे प्रतिपादन वस्ताद बाबासाहेब पवार यांनी केले.

या धार्मिक सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, वस्ताद बाबासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, राहुल गवारे ,राजू कुलकर्णी, बाबासाहेब जपकर, माजी उपसरपंच दादू चौगुले, वसंत पवार, विजय कर्पे, पाराजी चौरे, अशोक चौरे, बाळासाहेब बेल्हेकर, चेअरमन उमर सय्यद, पालखीचे मुख्य मानकरी रवींद्र भगत, लहानू गवारे, रावसाहेब कर्पे, अतुल गवारे, विठ्ठल चौरे ,चंद्रकांत खरमाळे, गोंधळी संतोष जाधव, रोहिदास साळवे, श्रीनिवास जपकर, शशी होळकर ,बंटी मोरे, रामदास गवारे, अंबादास जपकर, सहादू जपकर, शोभा पवार, मेधा पवार, आकाश पवार, निखिल भगत, भाऊसाहेब भगत यांच्यासह परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button