नागरिकांनो पाण्याची बचत करा – प्रा. डॉ. जयपाल पाटील

कृषी विज्ञान केंद्रात आपत्ती जोखीम आंतरराष्ट्रीय दिवस साजरा!
रोहा— सध्या महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने प्रत्येक नागरिकांनी पाण्याची बचत केलीच पाहिजे म्हणजे भविष्यात पाण्याची कमतरता होणार नाही त्यामुळे आपल्यावर अनेक आपत्या येऊ शकतात याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करावयास हवा असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी केले
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सेवा संकल्प अभियाना अंतर्गत क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र किल्ला तालुका रोहा येथे आयोजित केले होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मनोज तलाठी श्री. पांडुरंग बामणे व्यवस्थापक अपेडा भारत सरकार, डॉ. राजेश मांजरेकर विषय तज्ञ, डॉ. जीवन आरेकर आंबा कीड रोग ग विशेषज्ञ, डॉ. संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महाराष्ट्र गीत विद्यापीठ गीताचे गायन होऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सुरुवातीस अपेडाचे व्यवस्थापक श्री. बामणे यांनी फूड प्रोसेसिंग बाबत माहिती केंद्र सरकारचे अनुदान क्षमता बांधणी अंतर्गत माहिती सांगून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे शंका समाधान केले आणि आपली उत्पादने परदेशात पाठवण्याबाबत माहिती दिली, आंबा उत्पादनात कीड व रोगाबाबतची औषधे कशी मारावीत व कशा प्रमाणात घ्यावीत याची माहिती पीक विशेषज्ञ डॉ. जीवन आरेकर यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील प्रगतिशील शेतकरी व आंबा उत्पादक डॉक्टर संदेश पाटील यांनी परदेशात आंबे पाठवताना कशी व कोणती काळजी घेणे त्याचे अनुभव कथन करून अपेडाचे कोकण वासियांसाठी पनवेल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्याने वडखळ अथवा पेण येथे कार्यालय सुरू करावे अशी मागणी केली.
डॉ. जयपाल पाटील यांनी,13 ऑक्टोंबर म्हणजे आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन आपल्याकडे असलेल्या दोन चाकी चार चाकी व ट्रॅक्टर धुण्यासाठी आपण घरातील नळाला पाईप लावून धुवतो त्यामुळे पाण्याची खूप नासाडी होते आपल्या देशातील गर्भ श्रीमंत पारशी समाजाचे अनुकरण करावे, आपली वाहने एका बालीमध्येच पाणी घेऊन धुवतात, हा आदर्श सध्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईत घ्यावा तसेच आकाशातून वीज कोसळून शेतकऱ्यांची घरे, गोठे, झाडे, गुरेढोरे यांच्यावर आपत्ती येऊन नुकसान होते यासाठी आपल्याकडे मोबाईल वर दामिनी ॲप डाऊनलोड करून घ्यावा त्यामुळे आपल्यापासून किती अंतरावर व किती वेळाने वीज कोसळणार आहे हे सुरक्षेच्या दृष्टीने माहिती मिळते. अचानक शेतकऱ्यांचा अपघाती व सर्प विंचू दंशाने मृत्यू झाल्यास स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विमा योजनेअंतर्गत रुपये दोन लाख शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मिळतात याची माहिती दिली. तसेच पूर भूकंप, चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्ती त्यावेळेस सरकारी कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनी ही सहभागी होणे गरजेचे आहे यासाठी भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा केला आहे, यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकसान भरपाई मिळते याची माहिती दिली. कोणत्याही आपत्तीच्या वेळी सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे सांगितले.
यावेळी प्रगतिशील शेतकरी सौ. रूपाली देवकर, श्री. राजेश कोळसकर, श्री. गणेश भगत, श्री. गणेश म्हात्रे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर मासे विक्रेत्यांना फिश बॅग देण्यात आल्या. कार्यक्रमाध्यक्ष डॉ. मनोज तलाठी यांनी मान्यवरांच्या भाषणातील चांगल्या सूचनांचे स्वागत करून विद्यापीठाचे कुलगुरू श्री. संजय भावे त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात किल्ला विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांच्यासाठी विविध शेती उपयुक्त शिबिरांचे आयोजन करण्यात येते तसेच शेतकऱ्यांच्या सूचना कुलगुरू कडे पाठविल्या जातात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ़ राजेश मांजरेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन कारले यांनी केले आभार प्रदर्शन श्री. माधव गीते यांनी केले



