सुदीप हासे यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी.

स्कोपस इंडेक्स्ड जर्नल्समध्ये चार संशोधन लेख; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात उल्लेखनीय यश
संगमनेर : व्यवसायाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे दैनिक युवावार्ता, युवा पॉलिप्रिंट आणि युवा उद्योग समूहाचे संचालक सुदीप किसन हासे यांनी ओरिएंटल विद्यापीठ, इंदोर येथून संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सुदीप हासे यांनी “Design and Analysis of Cloud Deployed Intelligent Analysis of Real Time Twitter Data (TSaaS)” या विषयावर संशोधन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंग या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांवर त्यांनी आपल्या संशोधनात विशेष लक्ष केंद्रित केले.
पीएच.डी.च्या संशोधनकाळात त्यांनी नामांकित स्कोपस इंडेक्स्ड जर्नल्समध्ये चार संशोधन लेख प्रकाशित केले. तसेच स्कोपस इंडेक्स्ड तीन परिषदांमध्ये शोधनिबंध प्रकाशित केले. याशिवाय एक पुस्तक आणि एक पुस्तकातील प्रकरण (बुक चॅप्टर) प्रकाशित करून त्यांनी संशोधन व ज्ञाननिर्मिती क्षेत्रातील आपले योगदान अधोरेखित केले आहे.
सुदीप हासे यांनी यापूर्वी नामांकित ESDS Software Solutions Pvt. Ltd. या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीमध्येही काम केले आहे. त्यानंतर 8 वर्षे त्यांनी अमृतवाहिनीमध्ये प्रोफेसर म्हणून काम पाहिजे. आयटी क्षेत्रातील व्यावसायिक अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानातील रुची यांचा उपयोग त्यांनी पुढील संशोधनासाठी केला. डॉ. हासे हे लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरसारख्या विविध सामाजिक सस्थांशी जोडले गेलेले आहेत.
त्यांची शैक्षणिक कारकीर्दही उल्लेखनीय राहिली आहे. त्यांनी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी (बी.ई.) आणि पदव्युत्तर पदवी (एम.ई.) संपादन करताना दोन्ही अभ्यासक्रमांत प्रथम क्रमांक पटकाविला होता.
त्यांच्या पीएच.डी. संशोधनासाठी संशोधन मार्गदर्शक डॉ. मेघा सिंग, विभागप्रमुख डॉ. अतुल अगरवाल, डॉ. ममता मीना, रिसर्च डीन डॉ. धीरज नीम, अभियांत्रिकी विभागाचे डीन डॉ. शैलेंद्र सिंग आणि प्रो-चान्सलर डॉ. ध्रुव घई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संशोधनाची दिशा अधिक स्पष्ट होण्यास आणि संशोधनकार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यास मदत झाली.
व्यवसाय, व्यवस्थापन आणि संशोधन यांचा समतोल साधत मिळविलेले हे यश त्यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीचे, चिकाटीचे आणि ज्ञानार्जनाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक मानले जात आहे.
युवावार्ताचे संपादक किसन भाऊ हासे आणि सुशीला किसन हासे यांनी केलेल्या कष्टाचे आज चीज झाले. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करताना विशेष आनंद असल्याचे डॉ. सुदीप हासे यांनी यावेळी सांगितले.
त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांचे प्रोत्साहन, संशोधन मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. सुदीप हासे यांच्या या यशामुळे संगमनेरच्या शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.



