पत्रकारांना विधापरिषदेवर संधी द्यावी –
‘पत्रकारांना विधापरिषदेवर संधी द्या’
‘सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन’च्या महामेळाव्यात
विधिज्ञ गोपाळ शेळके यांचे सरकारला आवाहन
आरोग्य तपासणी शिबिरालाही मोठा प्रतिसाद
अलिबाग दि 18 (जि. रायगड) : पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते; पण, स्वातंत्र्यानंतर पत्रकारिता बदलत गेली. हल्ली राजकीय कार्यकर्ते नव्हे; तर, पत्रकारच खऱ्या समाजसेवकाची भूमिका निभावत आहेत. ही पत्रकारिता टिकवून ठेवण्यासाठी सरकारने पत्रकारांना प्रती महिना एक लाख रुपये पेन्शन आणि विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, तरच लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबुतीने उभा राहू शकेल,असे आवाहन कर्जतचे विख्यात विधीज्ञ ॲड.गोपाळ शेळके यांनी केली . ते अलिबाग येथील पत्रकारांच्या महामेळाव्यात बोलत होते. आपल्या मागण्यांसाठी पत्रकारांना संघटित लढा उभारण्याची भूमिकाही त्यांनी या प्रसंगी मांडली.
सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन (एसजेए) च्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सोमवारी ( दि.16) सांबरी, अलिबाग येथील वात्सल्य वृद्धाश्रमाच्या सभागृहात राज्य महामेळावा संपन्न झाला. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून संघटनेचे पदाधिकारी, सभासद आणि पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ‘एसजेए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जयपाल पाटील होते. राष्ट्रीय उपाध्यक्ष व विश्वस्त मिलिंद वैद्य, संस्थापक विश्वस्त व राष्ट्रीय सचिव संजयकुमार जोशी, निर्मिती व विकास संचालक शिरीष शिवणगीकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष व विश्वस्त चंद्रकांत कांबळे, संस्थेचे कायदेशीर सल्लागार ओंकार माने, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष यादवराव पावसे, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, स्थानिक पत्रकार व शिक्षण संस्थेचे संचालक प्रदीप पाटील, स्थानिक उद्योजक व पत्रकार अरविंद म्हात्रे आदी प्रमुख उपस्थित होते.
ॲड.शेळके पुढे म्हणाले, ” पत्रकारितेचे सेवाव्रत निष्ठेने आजही मोठ्या प्रमाणात निभावले जाते. परंतु, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे समाजाला दिशा देणारे समाजसेवक दिसत नाहीत. ती जबाबदारी आज पत्रकार सांभाळताना दिसतो. पण, सरकारला त्याची जाणीव करून द्यावी लागेल. सत्तेत राहून प्रश्न मांडता येतात आणि सोडवताही येतात. त्यासाठी पत्रकारांना विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व मिळायला हवे.”
‘एसजेए”चे शिक्षण विभाग संचालक व पिंपरी चिंचवडच्या ओझर्डे रॅडिकल इन्स्टिटयूटचे संचालक प्रा.भूषण ओझर्डे, कृषी व उद्योग विभागाचे संचालक संतोष पाटील, पुण्यातील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ नॉलेज या एज्युकेशनल स्टार्टअपचे कार्यकारी संचालक निलेश छेडवलकर, फीलगुड स्टार्टअपचे गजानन दळवी, प्रभाकर चेडे यांनी पत्रकारांच्या आर्थिक उत्पन्नासाठी असलेल्या संधी विषयी डिजिटल सादरीकरणासह उपस्थितांना अवगत केले. अनेक पत्रकारांनी या संधीचा लाभ घेण्याची तयारी दर्शविली. महामेळाव्यात सर्व पत्रकार व स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरासाठी रायगड जिल्हा आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाने परिश्रम घेतले.
तत्पूर्वी, आपल्या प्रास्ताविक भाषणात ‘एसजेए’ चे संस्थापक विश्वस्त व राष्ट्रीय सरचिटणीस संजयकुमार जोशी यांनी आपल्या हक्कासाठी जागृत होण्याचे आवाहन केले. ‘एसजेए’ ही केवळ एक संघटना नसून विश्वस्त संस्था आहे, त्यामुळेच आपण ज्येष्ठ पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी यांना उत्पन्नाच्या माध्यमातून सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. अल्पावधीत संस्थेने महाराष्ट्रात एक हजार सभासद नोंदणी पर्यंत मजल मारल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, जम्मू-काश्मीर आदी राज्यांत सभासद नोंदणी सुरू झाली असून अन्य ठिकाणाहून नोंदणीकरीता विचारणा होत असल्याची माहिती श्री. जोशी यांनी दिली. शेवगाव, पाथर्डी, जामखेड ( जि.अहिल्यानगर ) या तीन तालुक्यांसाठी अध्यक्ष म्हणून असिफ शेख यांची तर पिंपरी चिंचवड शाखेचे सरचिटणीस म्हणून संदीप पवार यांची नियुक्त केल्याची घोषणा राष्ट्रीय सरचिटणीस संजयकुमार जोशी यांनी केली.
‘एसजेए’चे विश्वस्त व राष्ट्रीय उपाध्यक्ष मिलिंद वैद्य यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी उपस्थितांना अवगत केले. ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन, अधिस्विकृती पत्र, राहण्यासाठी हक्काचे घर, आरोग्यासाठी वैद्यकीय सवलत आणि प्रत्येकी 10 लाख रुपयांपर्यंत मदत, त्यांच्या पाल्यांसाठी विविध शैक्षणिक व कुशल प्रशिक्षण देण्याची सुविधा याविषयी त्यांनी माहिती दिली. शैक्षणिक उपक्रमामध्ये राज्यातील पहिला पायलट प्रकल्प पिंपरी चिंचवड येथे येत्या काही दिवसांत सुरू होणार असून टप्प्या- टप्प्याने राज्यात विविध ठिकाणी मागणीनुसार असे केंद्र सुरु केले जाणार आहे. ज्यामध्ये जर्नालिझम, संगणक प्रशिक्षण, संगणक तांत्रिक सहाय्यक, ऑफिस असिस्टंट, परदेशी भाषा वर्ग इत्यादी नऊ प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस शिकविले जाणार आहेत. हे प्रशिक्षण केवळ पत्रकारांच्या मुलांसाठीच नाही तर आर्थिक दुर्बल घटक, शेतकरी, शेत मजुरांची मुले यांच्यासाठी देखील असणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. निवृत्त जेष्ठ पत्रकारांचे प्रश्न सरकारदरबारी एका छताखाली प्राधान्याने सुटावेत यासाठी केंद्र अथवा राज्य स्तरावर पत्रकारांसाठी महामंडळ अथवा कायम स्वरुपी आयोग स्थापन करावा, अशी मागणी ‘एसजेए’च्या माध्यमातून सरकारकडे केली असून त्याचा पाठपुरावा केला जात असल्याची माहिती श्री. वैद्य यांनी दिली.
मेळाव्यात संतोष पाटील, बळवंत वालेकर, प्रदीप पाटील, अरविंद म्हात्रे, रमेश शिंगे, रामचंद्र पिल्दे यांनीही आपले विचार मांडले.
आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात ‘एसजेए’ चे विश्वस्त व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधापरिषदेत आपला हक्काचा पत्रकार असायलाच हवा, याचा पुनर्रुच्चार केला. ते म्हणाले, “ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी ‘सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन’ ही एकमेव सेवाभावी विश्वस्त संस्था असल्याचा अभिमान वाटतो. पण, पत्रकारांचे प्रश्न विधी मंडळाच्या पटलावर मांडल्यशिवाय त्याचे गांभीर्य सरकारला समजणार नाही. त्यासाठी आपला प्रतिनिधी विधानपरिषदेत असला पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “विश्वासाच्या बळावर आपली संस्था आता महाराष्ट्राबरोबरच गुजरात, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आदी राज्यांत विस्तारत असल्याचा आनंद होतोय. जेष्ठ पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी आपली संस्था 10 लाखापर्यंत मदत करते आहे. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पेन्शन, अधिस्विकृती पत्र, पंतप्रधान आवास योजनेतून घरे, त्यांच्या पाल्यांसाठी, नातेवांईकांसाठी कुशल प्रशिक्षण अशा विविध मुद्द्यांवर कार्य चालू आहे. त्यासाठी आपल्या सर्व तडफदार पदाधिकाऱ्यांची टीम अविरत झटत आहे. त्यांना म्हणजेच पर्यायाने आपल्या ‘सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन’ला या कामासाठी सर्वांनी संघटित पाठिंबा व बळ द्यावे, असे आवाहन डॉ.जयपाल पाटील यांनी शेवटी केले.
महामेळाव्यास श्रीकांत सहस्रबुद्धे, सुनिल गिते, शेख फकीर इमामभाई,सतीशकुमार शहा, श्रीमती भारती शहा, डॉ. किशोर पाटील, डॉ. मणिलाल शिंपी (कल्याण, ठाणे ) संजय लोटणकर (नेहरूनगर, कोलाड, रोहा), रमेश शिंगे, अजय पाटील, परशराम शिंदे, नामदेव घोरपडे, प्रशांत मोरे
यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, आजी-माजी ज्येष्ठ पत्रकार आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



