अगस्तीच्या ज्ञानमंदिरात राजकीय घंटानाद!

पिचड यांच्या नेतृत्वाला बदनाम
करण्याचा प्रयत्न –
आर्थिक घोटाळ्याचा आरोप हा धादांत खोटा
सुनील गीते
अकोले दि 19
अकोले तालुका शिक्षण संस्थेवरील विश्वस्त व पदाधिकारी निवडीचे राजकारण चांगलेच पेटले आहे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी पिचडां नी अकोले तालुका शिक्षण संस्था ही पिचडांची प्रायव्हेट संस्था करून ठेवली आहे बरबटलेल्या लोकांना याठिकाणी पिचडांनी संधी दिली आहे संस्थेसाठी त्याग करणाऱ्यांना डावलले जाते असा आरोप आमदार डॉ किरण लहामटे यांनी केला आहे त्यापूर्वी संघर्ष समितीच्यावतीने विजयराव वाकचौरे यांनीही शिक्षण संस्थेत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप पिचडांवर केला आहे या कारणाने अकोले तालुका शिक्षण संस्थेमधील राजकारण चांगले ढवळून निघाले आहे शिक्षण संस्थेच्या ज्ञान मंदिरातील हा राजकीय घंटानाद आता कुठपर्यंत जातो याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे तर विरोधकांच्या या आरोपाला उत्तर देत संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे कोणताही घोटाळा झाला नाही संस्थेच्या सर्व निवडी या लोकशाही व कायदेशीर मार्गाने झाल्या आहे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे या नूतन पदाधिकर्यांनी म्हटले आहे
:- अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून या निवडी पूर्णपणे संस्थेच्या घटनेप्रमाणे कायदेशीर बाबींच्या अधीन राहून कार्यकारी विश्वस्त माजी मंत्री मधुकरराव पिचड व त्यांचे दोन सहकारी कायम विश्वस्त यांच्याशी चर्चा करुन निवड करण्यात आली आहे.
विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकारिणी निवडत असताना श्री.मधुकरराव पिचड यांनी त्यांचे सहकारी कायम विश्वस्त सिताराम पा.गायकर व वैभवराव पिचड यांनी अत्यंत लोकशाही मार्गाने तालुक्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करुन त्यांच्या संमतीने शिफारशीने विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकारिणी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते यांना स्थान देण्यात आले आहे या उभय पदाधिकार्यांमध्ये पदवीधर, इंजिनिअर, संशोधक, शिक्षक, वकील, उद्योजक, डॉक्टर, व्यापारी, महिला, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व सर्व समाज घटक यांना प्राधान्य देण्यात आले आहे. तथापि नेतृत्वावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न काही मंडळी दुर्दैवाने करत आहेत. विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकारिणी निवडताना जे संस्थेचे सभासद आहेत, त्यांचाच यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या निवड करण्यात आलेल्यांमध्ये अत्यंत अनुभवी, दर्जेदार, वैचारिक लोक आहेत.
सर्वसमावेशक व सर्वांना बरोबर घेऊन निवडीची गेल्या अनेक वर्षांची परंपरा याहीवेळी कायम ठेवली आहे. वास्तविक पाहता शैक्षणिक संस्था कुटुंबाच्या मालकीच्या केल्याची अनेक उदाहरणे असताना पिचड साहेबांनी मात्र हे एक आदर्श उदाहरण संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसमोर ठेवले आहे. राजकीय जोडे बाजुला ठेऊन एक निकोप, चांगले वातावरण या शैक्षणिक संकुलात निर्माण केले आहे.
संस्थेवर आर्थिक घोटाळ्याचा होणारा आरोप हा धादांत खोटा व चुकीचा आहे. सर्व विभागांचे कामकाज शासनाच्या नियमानुसार चालते. दरवर्षी संस्थेचे हिशोबपत्र लेखापरीक्षकाकडून तपासले जातात. संस्थेचे व संस्थेच्या सर्व शाखांचे व्यवहार पारदर्शी आहेत. लेखापरीक्षण अहवालामध्ये जर काही आक्षेपार्ह असते तर त्या बाबी निश्चित पुढे आल्या असत्या, किंबहुना त्या लपून राहिल्या नसत्या.
नोकरभरतीत आर्थिक घोटाळ्याचाही आरोप होतो. परंतु प्रत्येक विभागात नोकरभरती करताना विद्यापीठाने व शासनाने निवड समिती गठीत केलेली असते, त्याप्रमाणेत सदर कर्मचार्यांची नियुक्ती गुणवत्तेवर आधारीत केली जाते.
संस्था उभारणीमध्ये ज्या लोकांचे योगदान आहे, त्याची जाणीव ठेऊन विरोध असतानाही कालकथित दादासाहेब रुपवते यांचे नावही अकोले महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेला दिले आहे. कालकथित दादासाहेब रुपवते, स्व.यशवंतराव भांगरे, स्व.कॉ.बुवासाहेब नवले यांचेही योगदान नाकारुन चालणार नाही तर स्व.दादासाहेब रुपवते यांचे अनुयायी व शिक्षण क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेले मुख्याध्यापक मधुकरराव सोनवणे यांचीही स्वीकृत विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आहे.
माजी मंत्री व संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड यांचे संस्थेतील योगदानाबद्दल काहींना विसर पडतो परंतु त्यांनी जर मागे वळून बघितले तर १९७६ ला अकोले महाविद्यालयाची स्थापना झाली तेव्हा पिचड पंचायत समितीचे सभापती असताना कालकथित दादासाहेब रुपवते, स्व.यशवंतराव भांगरे, कॉ.बुवासाहेब नवले यांच्या खांद्याला खांदा लावून रोजगार हमीच्या कामावरील मजुरांकडून विडी कामगारांकडून एक – एक रुपया गोळा केला आणि अगस्ति महाविद्यालय उभे केले. त्यानंतर १९८५ ला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची उभारणी केली, तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षणाची सोय व्हावी यादृष्टीने १९८७ ला आंभोळ व मेहेंदुरी येथे विना अनुदानित तत्वावर माध्यमिक विद्यालये सुरु केली. त्यानंतर १९८९ ला शेंडी, १९९१ ला भैरवनाथ विद्यालय, चास व कन्या विद्यालय, अकोले पुढे शेषनारायण विद्यालय, कुंभेफळ व सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, धामणगाव पाट, १९९८ ला भारतरत्न राजीव गांधी विद्यालय, धामणगाव आवारी. सन २००० साली संत ज्ञानेश्वर विद्यालय, ढोकरी, सन २००६ ला शेंडी येथे ज्युनिअर कॉलेज, २००७ मध्ये संत कोंडाजी बाबा कला व वाणिज्य महाविद्यालय, कोतुळ, सन २०१२ ला समशेरपूर येथे कला व वाणिज्य महाविद्यालय सुरु करण्यात आले. ही सर्व विद्यालये, महाविद्यालये विना अनुदानित तत्वावर सुरु करण्यात आली, परंतु तत्कालिन मंत्री व संस्थेचे कार्यकारी विश्वस्त यांनी या शाळांना शासनाची मान्यता व अनुदान मिळवून दिले. सन २००९ ला सावित्रीबाई विद्यालय विठे संस्थेकडे वर्ग करण्यात पिचड यांचे मोठे योगदान आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमात अकोले येथे एम.बी.ए., पॉलिटेक्निक, एम.सी.ए., बी.बी.ए., बी.सी.ए., बी.सी.एस. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्रही सुरु करण्यात आले. परफेक्ट इंग्लिश मिडीअम स्कूलची सन २०१६ ला स्थापना करण्यात आली. तसेच आदिवासी भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी संस्थेने वसतिगृह सुरु केले आहे. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे. आज संस्थेचे २५ युनिट कार्यरत असून जवळपास ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर ५५० कर्मचारी सेवेत आहेत. हे सर्व उभे राहत असताना अनेक अडचणी, अडथळे आले परंतु पिचड साहेब
खंबीरपणे संस्थेच्या पाठीशी असल्याने त्यांच्या मंत्री पदाचा उपयोग करत संस्थेचा विकास झाला. आज यामुळेच प्रवरा, आढळा, मुळा खोर्यातील आदिवासी भागातील मुले – मुली यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली.
अकोले तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख बघितला तर पिचड साहेब शिक्षण सम्राट होऊ शकले असते परंतु दिन, दलित, आदिवासी, मागास, भटके, बहुजन, कामगार, समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी आदिवासी भागात शासकीय आश्रमशाळा तसेच आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाचे जाळे निर्माण केले. पिचड साहेब मंत्री पदावर असताना सन २०१४ ला कायम विना अनुदानितला कायम हा शब्द काढण्यात मोठे योगदान देणार्या व्यक्तिवर शिंतोडे उडविणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.संस्थेचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला ‘ए’ ग्रेड मिळाली आहे. अगस्ति महाविद्यालयाला नॅककडून ‘ए’ नामांकन मिळालेले आहे. नालंदा सारख्या स्पर्धा परीक्षा केंद्रातून अनेक विद्यार्थी आज क्लासवन अधिकारी म्हणून सेवेत आहेत. संस्थेतील विद्यालयांचे निकाल नेहमीच उत्कृष्ट राहिलेले आहेत. तालुक्यातील शेकडो विद्यार्थी तंत्रशिक्षणासाठी बाहेर जात असत, परंतु आज पॉलिटेक्निकच्या माध्यमातून ही सुविधा अकोल्यातच उपलब्ध झाल्यामुळे आदिवासी विद्यार्थी इंजिनिअर होत आहेत त्यामुळे संस्थेतील शैक्षणिक गुणवत्तेबद्दल चाललेली चर्चा ही निरर्थक आहे.
तथापि नेतृत्वावर टिका- टिपण्णी करणे, संस्था बदनाम करणे हा काही मंडळींचा उद्योग असून तालुक्यातील सर्वसामान्य जनता या भूलथापांना बळी पडणार नाही. संस्थेचे काम सर्व विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य प्रामाणिकपणे करतील.असे अकोले तालुका एज्युकेशन चे अध्यक्ष सुनील दातीर सेक्रेटरी सुधाकर देशमुख। तसेच विठ्ठलराव चासकर बाळासाहेब भोर धनंजय संत डॉ दामोदर सहाने कल्पना सुरपुरीया आनंद नवले, मच्छिंद्र धुमाळ ,शरद देशमुख यशवंत आभाळे, सुधाकर आरोटे, रमेश जगताप यांनी म्हटले आहे