माझा पुरस्कार बायफ च्या त्या सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ! जितीन साठे

श्री साठे यांचा कोरोना एकल समितीच्या वतीने सत्कार
अकोले प्रतिनिधी-
मला मिळालेला वसंतराव नाईक कृषी पुरस्कार हा बायफ च्या माध्यमातून ज्या महिलांना आम्ही स्वतःच्या पायावर उभे केले अशा सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान असल्याचे प्रतिपादन बायफ चे नाशिक विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी केले.
आदिवासी माणसांच्या ,महिलांच्या ज्ञानाला प्रतिष्ठा
वसंतराव नाईक कृषी पुरस्कार मिळाल्याबद्दल बाएफ संस्थेचे जितीन साठे यांचा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. एकल महिलांच्या पुनर्वसनात महत्वाची मदत करणाऱ्या जतीन यांचा संघटनेच्या वतीने हेरंबकुलकर्णी यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना जितीन साठे म्हणाले की ज्या महिलांना आम्ही स्वतःच्या पायावर उभे केले त्या सर्व कर्तृत्ववान महिलांचा हा सन्मान आहे.बाएफच्या मदतीने आजपर्यंत दीड लाख कुटुंबाना रोजगार देता आला हे समाधान आहे असे सांगून त्यांनी बाएफ चे काम, त्यांचा आजपर्यंत केलेला प्रवास व मणिभाई देसाई यांच्या कार्याची माहिती दिली व अकोल्यातील सर्व एकल महिलांना रोजगार मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी खंडूबाबा वाकचौरे,माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, शांताराम गजे, ऍड.वसंत मनकर, श्रीनिवास रेणूकदास,संगीता साळवे,प्राचार्य विद्याचंद्र सातपुते,शिवाजी नेहे, प्रमोद मंडलिक,गणेश कानवडे, रावसाहेब नवले,ललित छल्लारे, विशाल पगारे,सुभान शेख, सुनील शेळके,श्रीरंग भाटे,वैशाली राजगुरू उपस्थित होते.
यावेळी बोलताना शांताराम गजे यांनी माणूस म्हणूनही जितीन साठे यांचे मोठेपण सांगून शेतीचे प्रश्न असे जमिनीशी जोडलेली माणसेच दूर करतील असे सांगितले तर प्रकाश टाकळकर म्हणाले की,जितीन साठे यांनी आदिवासी माणसांच्या महिलांच्या ज्ञानाला प्रतिष्ठा मिळवून दिली व त्यांच्या घराला शेताला संशोधन प्रयोगशाळेचा दर्जा मिळवून दिला व माणसे स्वतःच्या पायावर उभी केली हे त्यांचे मोठेपण आहे.
यावेळी खंडूबाबा वाकचौरे,शिवाजी नेहे,रावसाहेब नवले, प्रमोद मंडलिक यांनीही जितीन साठे यांच्या गौरवाची भाषणे केली व त्यांची गुण वैशिष्ट्ये सांगितली.
हेरंब कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले तर ललित छल्लारे यांनी आभार मानले