पारनेरच्या क्रांती साखर कारखान्यावर गुन्हे दाखल करण्यास जिल्हा न्यायालयाची स्थगिती

दत्ता ठुबे
पारनेर – पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील क्रांती शुगर वर पारनेर न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला जिल्हा व सत्र न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे .
पारनेर तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री संदर्भात पारनेर न्यायालयात ॲड . रामदास घावटे व इतरांनी दाखल तक्रारीच्या अनुषंगाने प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी दि.१० रोजी दिलेल्या तपास व गुन्हा दाखल करण्याच्या आदेशास नगर येथील प्रधान व सत्र न्यायालयाने दि.२४ रोजी स्थगिती आदेश दिल्याने आदेशाने ॲड.रामदास घावटे यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे
. त्यांनी पारनेर कारखाना विक्री संदर्भातील तथाकथित बोगस कर्ज प्रकरण , बोगस गहाणखत व सदरील कर्ज वसुली प्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी २०१५ मध्ये जाहिर लिलावाद्वारे विक्री केलेल्या व्यवहारासंदर्भात अनियमितता झाल्याचा आरोप करून सर्वप्रथम पारनेर येथील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती, परंतु सदरील तक्रार दि.२५ एप्रिल २०२४ रोजी फेटाळली होती,त्यानंतर ॲड . घावटे यांनी नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय दुसरी तक्रार दाखल केली, ही तक्रार देखील जिल्हा व सत्र न्यायालयाने दि.१५ जून २०२४ रोजी फेटाळली,त्यानंतर त्यांनी पारनेर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांकडे नव्याने तक्रार दाखल करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अधिकारी व क्रांती कारखान्याचे संचालक मंडळ यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०६ , ४६८ , ४७१ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे व पुढील तपास करण्याचे आदेश द्यावेत,अशी विनंती दाखल केली होती.
पारनेर येथील प्रथम वर्ग दंडाधिकारी यांनी दि.१० जानेवारी रोजी आदेश देऊन पारनेर पोलीसांनी सदरील तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.त्यावर क्रांती शुगर कारखान्याच्या पदाधिकारी व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात पुर्णनिरीक्षण अर्ज दाखल करून पारनेर न्यायालयाच्या निकालाला आव्हानीत केले . त्याचा विचार करून जिल्हा न्यायालयाने पारनेर न्यायालयाच्या निकालाला तात्पुरती स्थगिती दिली.