खा.निलेश लंके यांची गडकिल्ले संवर्धनाची मोहीम प्रेरणादायी – डॉ.जयश्रीताई थोरात

गड किल्ले संवर्धन अभियानात संगमनेर मधील 1200 युवकांचा सहभाग
संगमनेर ( प्रतिनिधी )
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले गड किल्ले हेच खरे महाराजांचे स्मारके असून त्यांची जपवणूक करणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे. या किल्ल्यांची स्वच्छता संवर्धन यासाठी खासदार निलेश लंके यांनी सुरू केलेले अभियान हे संपूर्ण राज्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवउद्गार युवा नेत्या कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी काढले आहे.
अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला विश्रामगड येथे खासदार डॉक्टर निलेश लंके यांच्या संकल्पनेतून आपला मावळा उपक्रमातून गड किल्ले संवर्धन अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी खासदार निलेश लंके,डॉ.जयश्रीताई थोरात, सौ.प्रभावती काकी घोगरे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील 1200 युवकांनी या अभियानात सहभाग घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या सर्व किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी निलेश लंके यांच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून पट्टा किल्ला तथा विश्रामगडावर जिल्ह्यातील व संगमनेर तालुक्यातील सुमारे ३००० युवकांनी स्वच्छता व श्रमदान करून गड किल्ले संवर्धन अभियान राबवले. जय भवानी,जय शिवाजी घोषणासह हर हर महादेव, आम्ही मावळे शिवबाचे या घोषणांनी सह्याद्रीचा परिसर दुमदुमला. हातात झाडू, टोकरी, खोरे, आणि खांद्यावर भगवा झेंडा घेऊन या तरुणांनी पट्टा किल्ला परिसर स्वच्छ केला. यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून 1200 युवक डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणादायी गीते गात पट्टा किल्ल्याकडे रवाना झाली. यानंतर तेथे दिवसभर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. घरून नेलेली भाजी भाकरी खाऊन सर्व युवकांनी सह्याद्रीच्या कुशीमध्ये विश्रामगडावर स्वच्छता अभियान राबवून आपला दिवस संस्मरणीय ठरवला.
यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, खासदार निलेश लंके यांनी कोरोना संकटामध्ये अत्यंत प्रभावी काम केले. संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या या युवा नेतृत्वाने भारताच्या संसदेमध्ये शेतकरी सर्वसामान्य यांच्यासाठी आवाज उठवला. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे खरे स्मारक असून या किल्ल्यांच्या संवर्धनाकरता त्यांनी सुरू केलेले अभियान हे राज्यातील सर्व युवकांसाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव शिकवला याच विचारांवर महाराष्ट्राचे राजकारण सुरू होते. मात्र सध्या देशात आणि राज्यात सत्ताधाऱ्यांकडून सुरू झालेले जातीभेदाचे राजकारण हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाताना आपल्याला महाराष्ट्र आणखी बळकट करायचा असल्याचे त्या म्हणाल्या.
तर खासदार निलेश लंके म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने कायम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा घेऊन काम केले आहे. युवा पिढीतील 1200 तरुणांचा आपला मावळा उपक्रमात सहभाग हा समाज आणि असल्याचे सांगून महाराजांचा सर्वधर्मसमभावाचा विचार आपल्याला पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात न्यायचा असल्याचे ते म्हणाले.
तर सौ.प्रभावती घोगरे म्हणाल्या की, तरुणांच्या मनामध्ये जातीभेदाचे विष पेरण्यापेक्षा सर्व धर्म भावाचे अमृत पेरले पाहिजे याकरता हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी संगमनेर तालुक्यातील 1200 युवकांनी दिवसभर श्रमदान करून आपला मावळा अभियान संस्मरणीय ठरवले.
गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे –माजीमंत्री बाळासाहेब थोरात
हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. स्वराज्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेले गड किल्ले हे महाराजांचे खरे स्मारके आहेत. या स्मारकांची संवर्धनाची जबाबदारी ही सरकारची असून ती प्राधान्याने त्यांनी पार पाडली पाहिजे असे सांगताना समाजातील प्रत्येकाचे मन सामर्थ्यवान करण्याचे ताकत असलेले हे गड किल्ले याचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची असून त्यांचे संवर्धन केले पाहिजे असे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून या मावळा अभियानाला शुभेच्छा दिल्या.



