इतर

आदिवासी शेतकऱ्यांना दिले देशी भात वाणांच्या संवर्धन व बियाणे निवडीचे प्रात्यक्षिके!

एस. के. जाधव / प्रतिनिधी
कोकणवाडी (ता अकोले) दि.४ –
जिविधा प्रकल्पांतर्गत देवगाव व मान्हेरे येथील भात आणि भरडधान्य संवर्धन केंद्राला शेतकऱ्यांची अभ्यास भेट आयोजित करण्यात आली.

या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य अलेइमा इंडिया प्रा. लि., पुणे यांनी केले असून, तांत्रिक मार्गदर्शन बायफ लाईव्हलीहुड्स महाराष्ट्र यांनी केले. या अभ्यास भेटीत कोदनी गावातील एकूण ३० शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
या भेटीदरम्यान शेतकऱ्यांना भात व भरडधान्य पिकांच्या पारंपरिक आणि स्थानिक वाणांची ओळख करून देण्यात आली. उच्च उत्पादनक्षम, हवामान-तग धरणाऱ्या व स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाणांच्या निवडीबाबत मार्गदर्शन केले. काळभात, रायभोग, गरी कोळपी, आंबेमोहोर, नाचणी-कालपेरी, ढवळपेरी, शितोळी, दसरबेंद्री, वरई-घोशी आणि दुधमोगरा अशा देशी वाणांच्या संवर्धन व शुद्ध बियाणे निवडीची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.


भेटीचे प्रमुख उद्दिष्टे:
१. शेतकऱ्यांना पारंपरिक व स्थानिक भात आणि भरडधान्य वाणांची सखोल माहिती देणे.
२. स्थानिक कृषी वारसा जपण्याचे महत्त्व स्पष्ट करून उत्पादनक्षमतेवरील चर्चा.
३. बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या व स्थानिक शेतीसाठी योग्य वाणांची निवड.
४. स्थानिक देशी लागवडीसाठी आवश्यक जमीन व हवामानाचा अभ्यास.
५. लोकसहभागातून शुद्ध बियाण्यांची निवड, संवर्धन व प्रचार.
६. बियाणे उत्पादन, साठवण पद्धती व बियाणे बँकेचे कार्य समजावणे.
भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी बियाणे बँक, बियाणे उत्पादन प्लॉटला भेट देवून स्थानिक वाणांचे पोषणमूल्य व बाजारपेठेतील मागणी याबाबत सविस्तर माहिती घेतली. या अभ्यास भेटीमुळे शेतकऱ्यांना स्थानिक वाण संवर्धन, हवामान-प्रतिरोधक शेती, शुद्ध बियाणे निवड आणि टिकाऊ शेती तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळाले. त्यामुळे शेतकरी पुढील हंगामात स्वतःचे बियाणे तयार करून उत्पादन खर्चात बचत करतील आणि स्थानिक पातळीवर स्वावलंबी शेतीचा आदर्श निर्माण करतील. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल घडवून स्थानिक शेती वाणांचे जतन, सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि टिकाऊ कृषी व्यवस्थेकडे वाटचाल अधिक गतीने होईल,
या अभ्यास भेटीचे नियोजन बायफ चे कृषीजैवविविधता मुख्य तांत्रिक कार्यक्रम संचालक संजय पाटील, मुख्य कार्यक्रम व्यवस्थापक प्रदीप खोसे, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सह जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश नवले यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रामकृष्ण भांगरे, आनंदा गोलवड, एसबीआय फेलोशिप विद्यार्थी नागळू तारकराम रेड्डी आणि मार्टिकल मैथलू यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button