नेवासा शहरातील अस्वछतेचा प्रश्न सुटणार कधी!

दत्तात्रय शिंदे
नेवासा /माका प्रतिनिधी
नेवासा शहरात कचऱ्याचा प्रश्न आता फक्त “स्वच्छतेचा” राहिलेला नाही… तर तो नागरिकांच्या आरोग्याशी, प्रशासनाच्या निष्क्रियतेशी आणि लोकांच्या सहनशीलतेच्या अंताशी जोडला गेलेला गंभीर प्रश्न बनला आहे…
आठ दिवसांपूर्वी नेवासा शहरात भाजप तसेच क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना सोबत घेत धनकचरा व्यवस्थापन विभागाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभं केलं होतं… हातगाड्यांमधून शहरातील विविध भागातील कचरा थेट नगरपंचायत कार्यालयाच्या पायऱ्यांवर आणून टाकण्यात आला होता… त्या आंदोलनावेळी नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधातील रोष आणि असहाय्यता स्पष्टपणे दिसून आली होती…मात्र त्या आंदोलनाला आज तब्बल आठ दिवस उलटून गेले…
पण शहरातील परिस्थिती “जैसे थे”च असल्याचं चित्र दिसत आहे…

नेवासा शहरातील विविध भागांमध्ये, विशेषतः धार्मिक स्थळांच्या परिसरातच मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत रस्त्याच्या कडेला उघड्यावर पडलेला कचरा त्यातून उठणारी तीव्र दुर्गंधी आणि त्या घाणीमध्ये मुक्तपणे फिरणारी डुक्करं व भटकी कुत्री… हे दृश्य आता नेवासकरांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनत चाललं आहे…
स्थानिक नागरिकांच्या मते, या कचऱ्यामुळे केवळ परिसर अस्वच्छ होत नाही… तर दुर्गंधी थेट घरांपर्यंत पोहोचत आहे
लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विविध आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागत आहे…
डास, माशा आणि संसर्गजन्य आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत…

विशेष म्हणजे इतक्या तीव्र आंदोलनानंतरही नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही किंवा सुधारणा दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासना विरुद्ध प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे …
“आंदोलन झालं… घोषणाबाजी झाली… कचरा नगरपंचायतीच्या दारात टाकला गेला… पण प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही का?” असा संतप्त सवाल आता नेवासकर नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत…
स्वच्छ शहराच्या घोषणा देणाऱ्या प्रशासनाने आता किमान नागरिकांच्या आरोग्याचा तरी विचार करावा… अन्यथा हा कचऱ्याचा प्रश्न उद्या आणखी मोठ्या सार्वजनिक आरोग्य संकटाचं रूप घेऊ शकतो…आणि मग त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार…?असा सवाल नागरिकांत केला जात आहे


