देश समृद्ध करण्यासाठी तरुणांनी राज्यघटना व लोकशाही जपण्यासाठी कटिबद्ध पाहिजे- बाळासाहेब थोरात

संगमनेर ( प्रतिनिधी )
देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर पुरुषांनी बलिदान दिले. त्यांना अभिवादन करताना हा देश अधिक समृद्ध करण्यासाठी तरुणांनी राज्यघटना व लोकशाही जपण्यासाठी कटिबद्ध राहिली पाहिजे. आपल्या राज्यघटनेने जगाला मानवतेचा संदेश दिला असून चांगल्या सहकारी व शिक्षण संस्था हे आपले वैशिष्ट्य असून स्वतंत्र अमृतवाहिनी विद्यापीठ मिळाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
अमृत उद्योग समूहात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, बाबासाहेब ओहोळ, कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, अमृतवाहिनी संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, संचालक विजय राहणे, रामनाथ कुटे,डॉ. तुषार दिघे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्रा. विवेक धुमाळ, किरण कानवडे, कृष्णा दिघे यांच्यासह विविध पदाधिकारी सर्व विभागांचे प्राचार्य अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक राष्ट्रपुरुषांनी त्याग व बलिदान केले आहे. त्यांच्या प्रति आदर राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विविध भाषा धर्म जात पंथ असूनही राज्यघटनेमुळे आपण सर्व एक आहोत. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेमुळे आपल्याला मिळाले आहे देश अधिक सामर्थ्यवान होण्यासाठी राज्यघटना जपणे अत्यंत गरजेचे आहे.

मात्र सध्या काही लोक धर्माच्या नावावर राजकारण करत असून जातीभेद निर्माण करत आहेत. गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगाराला कोणताही धर्म नसून त्याला शिक्षा झालीच पाहिजे. असे सांगताना थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या 18 व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली 18 महिने कारावास भोगला त्यांचा वारसा आपल्याला लाभला असून त्यांच्या तत्त्वानुसार संगमनेरच्या सहकारी व शैक्षणिक संस्था वाटचाल करत आहेत.
यावर्षी स्वतंत्र अमृतवाहिनी विद्यापीठ मंजूर झाले असून ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. यापुढील काळातही सर्वांना गुणवत्तेने काम करून हा लौकिक वाढवावा लागणार आहे याचबरोबर राज्यघटना जपण्यासाठी व अधिक मजबूत करण्यासाठी तरुणांनी कटिबद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले.
तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, तरुण ही देशाची संपत्ती आहे. झेन झी ने क्रांती केली आहे. हा देश आपल्याला पुढे नेण्यासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन साधूसंतांनी सांगितलेला मानवतेचा विचार जोपासावा लागणार आहे असे त्या म्हणाल्या.
यावेळी सुरक्षा अधिकारी मोहनराव मस्के यांच्या नेतृत्वाखाली कारखाना कार्यस्थळावर तर नरेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने परेड ने मानवंदना दिली. अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले.

अमृत उद्योग समूहात विविध ठिकाणी अभिवादन
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना मुख्य कार्यस्थळावर व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते तर ध्वजारोहण झाले. राजहंस दूध संघ येथे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्या हस्ते तर डेंटल कॉलेज येथे डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अमृतवाहिनी बँकेमध्ये कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी या सर्व संस्थांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांमधून देशभक्तीचा जागर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहातील विविध विद्यालय व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी अत्यंत दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यामध्ये पंजाबी, भांगडा,गवळण,डोंबारी गीत,फ्युजन सॉंग,महाराष्ट्राची लोकधारा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा यांच्यासह विविध कार्यक्रमांनी अंगावर शहरे आणले. सर्व गीतांमधून देशभक्तीचा जागर करण्यात आला. यावेळी पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते


