शेतकऱ्याला कायद्याचे संरक्षण व उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांची मागणी;

संजय उकिरडे/ प्रतिनिधी
पुणे: “मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाच्या अनियमिततेमुळे शेती संकटात सापडली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्याला कायद्याचे संरक्षण, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला पाहिजे,” अशी मागणी ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केली.
डॉ. मुळीक यांनी २७ सप्टेंबर रोजी वयाची ८५ वर्षे पूर्ण करून ८६व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त भूमाता परिवार आणि मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळ, हवामान बदल, शेतीचे प्रश्न आणि शेतकरी धोरणांबाबत भूमिका मांडली. प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, ऍड. केदार सोमण, सामाजिक कार्यकर्ते राज देशमुख, माजी महापौर कमल व्यवहारे यांच्यासह कृषी, राजकीय व प्रशासनातील अनेक मान्यवरांनी डॉ. मुळीक यांना शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.

डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, ‘‘दुष्काळी भागातील प्रत्येक कुटुंबातील किमान दोन व्यक्तींना दररोज ३०० रुपये मजुरी देऊन त्यांच्या शेतातच जलसंधारण आणि शेतीची कामे उपलब्ध करून द्यावीत. त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाला उत्पन्न मिळेल आणि त्याच्या शेतातील पाण्याच्या उपलब्धतेतही वाढ होईल. त्यातून शेतकऱ्याचा सन्मानही कायम राहील. शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून, देशाचा प्राण आहे. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनासाठी कायद्याचे संरक्षण आणि उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळाल्याशिवाय शेती व शेतकरी समृद्ध होणार नाही. शेतकरी समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल.”
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जे माफ करून बँका, पतसंस्था आणि खासगी सावकारांची सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणी करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या उच्च, तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणाचा तसेच वसतिगृहाचा खर्च सरकारने करावा. पशुधनासाठी पाणी व चाऱ्याच्या छावण्या तातडीने सुरू कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. युवा पिढीने कृत्रिम जीवन जगण्यापेक्षा निसर्गाशी नाळ जोडून नैसर्गिक जीवन जगावे. टेक्नॉलॉजी आणि शिक्षणाचा वापर शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी, तण-खत व्यवस्थापनासाठी आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी करा, असा संदेश त्यांनी दिला.

पूर्वी मराठवाडा हा धान्याचे कोठार मानला जात होता. मात्र, संकरित बियाणे, नगदी पिकांचा वाढता आग्रह आणि गायरानांचे कमी होणे यामुळे शेती व पशुधनासमोर संकट निर्माण झाले आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याने शहरातील जैविक कचऱ्यापासून सेंद्रिय खते तयार करून ती शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनाच्या नुकसानीवर आधारित कायदेशीर भरपाईची व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्याची गरज आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न हे मूलभूत हक्क आहेत आणि ते शेतकरीच उपलब्ध करून देतो, असे त्यांनी नमूद केले.

प्रवीण तरडे व राज देशमुख यांनी डॉ. बुधाजीराव मुळीक गेल्या ६० वर्षांपासून शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे प्रयोग करीत असून, त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. डॉ. मुळीक यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतीमधील प्रयोगांसाठी वाहून घेतले आहे. वयाच्या पंच्याऐंशीमध्येही त्यांचे प्रयोग आणि शेतकऱ्यांसाठीचा लढा सुरु आहे. येत्या काळातही त्यांच्याकडून शेतकऱ्यांना व शेती क्षेत्राला मार्गदर्शन होत राहावे, असे मत व्यक्त केले.
भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. सुरेश पवार, डॉ. m. s. जाधव, महिपतराव फडतरे, ॲड. कमल सावंत, डॉ. श्यामराव भगत, सुरेश कोते, यशवंत खैरे, हेमंत सूर्यवंशी, सुरेश खोपडे आदी अनेक मान्यवरांनी डॉ. मुळीक यांचे अभिष्टचिंतन केले.
अमेरिकेच्या कृषी खात्यात प्रधान अर्थशास्त्रज्ञ पदावर काम करणाऱ्या त्यांच्या कन्या डॉ. क्रांती मुळीक या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आवर्जून उपस्थित राहिल्या



