कर्मवीर जयंती सोहळ्यातील सत्कार प्रेरणादाची : – प्रा. शिवाजीराव बारगळ

गणेशनगर – पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळेच आमच्यासारख्या ग्रामीण भागातील रयत चे कल्याण झाले, त्यांच्या जयंती सोहळ्यात सत्कार होणे हा चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी व्यक्त केले.
गणेशनगर येथील श्री गणेश विद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३९ वा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व प्रमुख पाहुणे श्री रावसाहेब नाथाजी पा. म्हस्के यांच्या हस्ते प्रा. शिवाजीराव बारगळ यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रमुख वक्ते म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्राध्यापक डॉ. बाबुराव उपाध्ये होते. अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री रावसाहेब पांडुरंग पा. गाढवे होते. सरपंच सौ. सुनीताताई सोपानराव पा. कासार, सेवानिवृत्त प्राचार्य मधुकरराव अनाप, शिक्षक नेते कैलास चिंधे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा निरपेक्ष सेवेचा आदर्श समोर ठेवला पाहिजे असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे रावसाहेब पा. म्हस्के यांनी, माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भरभरून योगदान देणे गरजेचे असल्याचे सांगितले.अध्यक्षीय मनोगतातून रावसाहेब पा. गाढवे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. अनेक मान्यवरांची भाषणे झाली. मुख्याध्यापक वसावे यांनी स्वागत केले. धनवडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जयश्री उंडे मॅडम व विनिता वराडे मॅडम यांनी केले तर भिंगारदे यांनी आभार मानले.



