लक्ष्मी आईच्या कृपेने गावात समृद्धी येवो- गोपीनाथ होळकर .

नेप्तीत लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात साजरी,
अहिल्यानगर : प्रतिनिधी
-नगर तालुक्यातील नेप्ती गावात श्रद्धा, एकता आणि परंपरेचा त्रिवेणी संगम पहायला मिळाला. गोपीनाथ होळकर यांनी गावातून लोकवर्गणी गोळा करून सर्वांना बरोबर घेऊन लक्ष्मीआई यात्रा उत्साह साजरी केली .
यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती रामदास फुले यांनी दिली .
लक्ष्मी आईच्या यात्रेनिमित्त लक्ष्मी आईचे मंदिर फुलांच्या माळांनी सजविले होते . ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक यात्रेचा मुख्य सोहळा असलेली मिरवणूक दुपारी 4 वाजता गावातून मोठ्या दिमाखात निघाली. मिरवणुकीच्या अग्रभागी संबळ, हलगी, ढोल आणि ताशा, सनई, वादकांनी वातावरण भारून गेले होते.
पारंपरिक वेशभूषेतील पोतराजांनी अंगावर आसूड ओढत भक्तीचा नजराणा सादर केला. चट्ट... चट्ट... असा आवाज येताच संपूर्ण परिसरात एकच जयघोष झाला.
मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिलांनी डोक्यावर कलश घेत सहभाग नोंदवला. हातात नारळ, पेढे आणि फुलांच्या ताटांसह महिला “लक्ष्मीमाता की जय” चा गजर करत चालत होत्या. पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक गावातील मुख्य चौक, बाजारपेठ मार्गे मंदिरात आली. ग्रामस्थ व साळवे परिवाराच्या वतीने पोपट साळवे यांच्या हस्ते लक्ष्मीआईला गंगाजलाने अभिषेक घालून विधीवत पूजा व महाआरती करण्यात आली . यावेळी ग्रामस्थांनी लक्ष्मी आईला चांगल्या पावसासाठी साकडे घातले.
तसेच लक्ष्मी आईच्या मंदिराचे बांधकाम चालू असून दानशूर भाविकांनी व ग्रामस्थांनी मंदिराच्या कामासाठी सरळ हाताने मदत करावी असे आव्हान नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले . यात्रेला जुनी परंपरा असून दरवर्षी भाविक मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होतात.

लक्ष्मी आई ही फक्त आपली कुलदेवता नाही, तर नेप्ती गावचा प्राण आहे. आज आपण सर्व जाती-धर्म विसरून एकत्र आलो, हेच या यात्रेचे खरे यश आहे. शेतकऱ्यांच्या शेतात धनधान्य पिकावे, प्रत्येकाच्या घरात सुख-शांती आणि आरोग्य नांदावे हीच आई चरणी प्रार्थना. ही यात्रा फक्त एक दिवसाची नाही, तर ती आपल्या संस्कृतीचे जतन आहे. मंदिराचे भव्य बांधकाम सुरू आहे. त्यासाठी सर्वांनी मदत करावी. लक्ष्मीच्या कृपेने गावात सुख-समृद्धी येवो असे प्रतिपादन गोपीनाथ होळकर यांनी केले.
यावेळी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, महिला , ग्रामस्थ व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
नेप्तीच्या या यात्रेने पुन्हा एकदा “एक गाव, एक मन, एक श्रद्धा” हे ब्रीद वाक्य सार्थ ठरवले.


