इंदोरीचे ताराचंद नवले कृषीथॉन २०२५’ ‘प्रयोगशील शेतकरी पुरस्काराने’सन्मानीत

‘
एस के जाधव
कोकणवाडी ता.अकोले, दि 14
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी गावचे प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी ताराचंद पांडुरंग नवले यांना प्रतिष्ठेच्या ‘कृषीथॉन २०२५’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनामध्ये ‘प्रयोगशील शेतकरी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे.
‘कृषीथॉन’ हे १९९८ पासून दरवर्षी आयोजित केले जाणारे आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन असून, आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्य आणि युवकांचा शेतीकडे ओढ वाढविणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख हेतू आहे. यंदाच्या प्रदर्शनात श्री. नवले यांच्या प्रयोगशील शेतीतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवले हे बी.ए. (अर्थशास्त्र) पदवीधर असून, नोकरीच्या मागे न लागता त्यांनी वडिलोपार्जित शेतीला व्यवसाय आणि करिअर म्हणून स्वीकारले. “शेती हीच खरी उद्योगसंस्कृती आहे” या विचारातून त्यांनी शेतीकडे आधुनिक दृष्टीकोनातून पाहत सेंद्रिय शेतीचा पुरस्कार केला. त्यांच्या शेतात अद्रक, फुलशेती आणि ऊस पिकांमध्ये सेंद्रिय पद्धतीने घेतलेले उत्पादन त्यांच्या प्रयोगशीलतेचे उत्तम उदाहरण आहे.
त्यांचे वडील पांडुरंग कारभारी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खडकाळ माळरानावर फुलवलेली शेती, पशुधन व दुग्ध व्यवसायातील नियोजनबद्ध कार्य आणि शाश्वत शेती तंत्रांचा अवलंब या माध्यमातून नवा आदर्श निर्माण केला. त्यांच्या प्रयोगशील वृत्तीमुळे परिसरातील अनेक तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे.

या सन्मानामुळे नवले यांच्या कार्याचे कृषी तज्ज्ञ, कृषी संस्था तसेच समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत असून, हा पुरस्कार त्यांच्या समर्पित, प्रयोगशील आणि आदर्शवत कृषी कार्याची दखल असल्याचे कृषी जाणकारांनी नमूद केले आहे.
“‘कृषीथॉन २०२५’ मधील ‘प्रयोगशील शेतकरी पुरस्कार’ हा माझ्यासाठी प्रेरणादायी सन्मान आहे. वडील पांडुरंग कारभारी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शेती ही केवळ परंपरा नसून सक्षम करिअर आणि उद्योगसंस्कृती असल्याचा मला अनुभव आला. प्रामाणिकपणा, नियोजन व बाजारपेठेचा अभ्यास यावर यशस्वी शेती अवलंबून आहे. सेंद्रिय शेती व नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेती निश्चितच शाश्वत आणि नफ्याची ठरेल. उत्तम शेती हीच खरी समृद्धीची गुरुकिल्ली आहे.”
ताराचंद पांडुरंग नवले,इंदोरी ता.अकोले, जि. अहिल्यानगर



