इतर

देशभरातील शेतकऱ्यांना दर्जेदार शेतरस्ते मिळाले पाहिजेत” – शरद पवळे


राष्ट्रीय पातळीवर शिवपाणंदची झेप,

रांजणगाव गणपती येथे किसान जागृती यात्रेचे स्वागत


दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :

-महाराष्ट्राच्या मातीतून उगम पावलेली शिवपाणंद शेतरस्ता चळवळ आज केवळ एका राज्याची राहिलेली नाही तर ती देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या आशा आकांक्षांची हाक बनली आहे. “शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी” हे केवळ घोषवाक्य नाही तर ग्रामीण भारताच्या सन्मानाचा संकल्प आहे. शिवपांणद शेत रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी या संकल्पाला राष्ट्रीय रूप देण्याचा निर्धार व्यक्त करत लवकरच दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद घेण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान कन्याकुमारी ते काश्मीर अशी निघालेली किसान जागृती यात्रा रांजणगाव गणपती येथे दाखल होत आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही यात्रा एमएसपीला कायदेशीर हमी, कर्जमाफी, एफआरपी वाढ आणि पीक विमा सुधारणा यांसारख्या मागण्यांसह शेतरस्त्यांच्या प्रश्नालाही राष्ट्रीय न्याय मिळावा, ही ठाम भूमिका देशभर पोहोचवत आहे.
शरद पवळे यांनी भावनिक शब्दांत स्पष्ट केले.
“शिवपाणंद ही केवळ रस्त्यांची मागणी नाही; ती शेतकऱ्याच्या सन्मानाची आणि ग्रामीण स्वाभिमानाची चळवळ आहे. शेतापर्यंत पोहोचणारा रस्ता म्हणजेच कष्टाला मिळणारा न्याय.” न्यायालयीन व प्रशासकीय संघर्षाच्या बळावर अनेक ठिकाणी शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. संघर्ष, संयम आणि कायदेशीर लढ्याच्या आधारावर उभी राहिलेली ही चळवळ आज ग्रामीण भारताच्या नव्या पहाटेची चाहूल देत आहे. ही केवळ चळवळ नाही तर ही मातीतल्या घामाला, कष्टाला आणि शेतकऱ्याच्या स्वाभिमानाला दिलेली देशव्यापी साद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button