नेप्तीत गोसावी बाबांचा भंडारा उत्सव, भक्तिमय वातावरणात भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.

अहिल्यानगर : प्रतिनिधी
— नगर तालुक्यातील नेप्ती येथे श्री गोसावी बाबांचा सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात येणारा भंडारा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. उत्सवानिमित्त संपूर्ण नेप्ती नगरीत धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. पुंड परिवाराच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पारंपरिक धार्मिक परंपरा जपत पुंड परिवाराने यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले होते अशी माहिती रामदास फुले यांनी दिली
या उत्सवानिमित्त श्री गोसावी बाबांच्या समाधी परिसराची विशेष स्वच्छता करण्यात आली होती. परिसरात शेणाचा सडा टाकून महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. फुलांची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाईने समाधी परिसर उजळून निघाला होता. त्यामुळे संपूर्ण परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते.
श्री. सिताराम पुंड व प्राध्यापक भाऊसाहेब सिताराम पुंड यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात श्री गोसावी बाबांना पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर नंदनवन उद्योगसमूहाचे संचालक बाबासाहेब जाधव, शिवसेना विधानसभा प्रमुख नगर शहर दत्ता जाधव व सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, माजी सरपंच अंबादास पुंड, विलास चौरे, ग्रामपंचायत सदस्य रामदास पुंड, आसाराम पुंड, प्रा. एकनाथ होले ,प्रा. बबन कांडेकर तसेच वेताळबाबा मित्रमंडळ यांच्या हस्ते श्री गोसावी बाबांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी भाविकांनी फुलांची उधळण करत ‘गोसावी बाबा की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला.
सायंकाळी गावातील विविध भजनी मंडळांच्या सहभागाने टाळ-मृदंगाच्या गजरात गावातून भव्य दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. दिंडीत महिला, युवकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भक्तिगीते, अभंग आणि जयघोषाने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. दिंडीनंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला.
यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पुंड परिवाराने महाप्रसादाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केल्याने नेप्तीसह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण उत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला, युवक तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



