
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील पोस्ट कार्यालयातील सहायक शाखा डाकपाल ओंकार गंगाधर तेलंग याने ग्राहकांच्या विविध खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम त्यांच्या खात्यात न भरता तब्बल १ लाख ८४ हजारांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
याप्रकरणी संगमनेर येथील संतोष सुरेश जोशी यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार, समशेरपूर येथील सहायक शाखा डाकपाल ओंकार गंगाधर
तेलंग यांच्याकडे ग्राहकांनी विविध खात्यांत रक्कम जमा करण्यासाठी दिली होती. मात्र संबंधित रक्कम खात्यात जमा न करता त्याने अपहार केल्याचे चौकशीत समोर आले.
१ जून २०२५ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तेलंग सावरगाव पाट शाखा डाकघरात हंगामी स्वरूपात शाखा डाकपाल म्हणून कार्यरत होता . त्यावेळी फिर्यादी जोशी हे सावरगाव पाट पोस्ट ऑफिसच्या वार्षिक तपासणीसाठी गेले असता, पोस्ट ऑफिस बंद असल्याचे, तसेच ओंकार तेलंग गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. चौकशीदरम्यान
तेलंग याची बदली सावरगाव पाट पोस्ट ऑफिसमध्ये शाखा डाकपाल म्हणून करण्याचा निर्णय झाल्याचे समोर आले. मात्र, डाक निरीक्षक काळू मारुती सदगीर यांनी सावरगाव पाट पोस्ट ऑफिसला भेट देऊनही कार्यालयीन दप्तर आढळून न आल्याने संशय अधिक बळावला. अखेर तपासणीत दोन वर्षांपासून नवीन खाते स्वीकारलेली रक्कम १ लाख ६० हजार रुपये, सुकन्या समृद्धी खात्यातील अनुक्रमे १२ हजार व १२ हजार रुपये, अशी एकूण १ लाख ८४ हजार रुपयांची रक्कम अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
=======


