निवृत्त रयत सेवक संजय उकिरडे यांचे मौलिक योगदान :- डॉ. बाबुराव उपाध्ये

अकोले प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखेत प्रामाणिक सेवाकार्य पूर्तता करणारे आणि बेलापूर बदगी, कोतुळ, वारी, जवळा शाखेतून सेवानिवृत्त झालेले चित्रकला शिक्षक संजय भागूजी डकिरडे यांचे विविध क्षेत्रात मौलिक योगदान असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सेवानिवृत्त झालेले चित्रकला शिक्षक संजय भागूजी उकिरडे यांचा सपत्नीक सत्कार करताना डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. संजय उकिरडे यांनी पत्रकारिता, सामाजिक, आध्यात्मिक उपक्रम, कुंभारकला निर्मिती, विद्यार्थी गुणगौरव, सहयाद्री माझा डॉट कॉम इत्यादी माध्यमातून मोठे योगदान दिले, देत आहेत. चित्रकला शिक्षक म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखेसह बेलापूर बदगी येथे दीर्घकाळ सेवाकार्य केले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. अनेक समस्यांना सामोरे जात त्यांनी आपले आदर्श कार्य सुरू ठेवले, त्यांच्या या सत्कार्याचा सत्कार म्हणजे ज्ञानपूजा असल्याचे सांगून डॉ. उपाध्ये यांनी संजय उकिरडे यांचा सन्मान केला. प्रतिष्ठान कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी सौ. नलिनीताई उकिरडे यांचा सत्कार केला.

याप्रसंगी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, कुंभार समाजाचे कार्यकर्ते बाबासाहेब वाकचौरे, निर्मिक उपाध्ये, अथर्व संजय उकिरडे, श्रीमती देऊबाई भागूजी उकिरडे श्रीमती चंद्रभागाबाई दत्तात्रय उकिरडे आदी उपस्थित होते.
चित्रकला शिक्षक संजय उकिरडे यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांना कर्मवीर पुतळा, शाल, फेटा, भेटवस्तू देऊन सत्कार केला. आपल्या मनोगतातून वाचन संस्कृतीच्या सत्काराला उत्तर देताना संजय उकिरडे म्हणाले, आमचे कुंभार कुटुंब गाडगी, मडकी करून उदरनिर्वाह करीत असे. बलुतेदारी करून पोट भरणे एवढेच काम होते. घरात शिक्षण नव्हते, परंतु कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागात शिक्षण सुरू केले म्हणून आम्ही शिक्षण घेऊ शकलो, कर्मवीर संस्कृती विचारांच्या माणसांमुळे नोकरी मिळाली. रयत साठी मोठे योगदान देणारे सुरेशजी कोते साहेब यांनी हरेएक प्रसंगी मदत केली, तसेच समाजसेविका सौ. हेमलताताई पिचड, शेतीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक अशी कर्मवीर विचारांची माणसे हीच रयत ची खरी ओळख आहे, अशा समाज सेवकांमुळे रयतची प्रतिष्ठा व कार्य वाढले असल्याचे सांगितले. कोल्हापूर येथील प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार संपादिन भारतीय कुंभार समाज : शोध आणि बोध या महाग्रंथाचेही कौतुक केले.असे सांगून त्यांनी आपले जीवनानुभव सांगितले.
शिक्षिका सौ. नलिनीताई उकिरडे यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या प्रचंड, अमूल्य ग्रंथासंग्रहाचे, शेकडो पुरस्कार, सन्मान चिन्हांचे कौतुक केले. वाचकांनी या ग्रंथांचा उपयोग करावा. शिरसगावसारख्या खेड्यात अशी मोफत ग्रंथसेवा दुर्मिळ असल्याचे सांगून आता आपणही लेखन करणार असल्याचे सांगितले. संजय उकिरडे यांची वारली चित्रकला पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणार आहे, वारली चित्रकला व इतर चित्रांचे प्रदर्शन लवकरच आयोजित करणार असल्याचे सांगितले.यावेळी डॉ. उपाध्ये यांनी सर्वांना अनेक पुस्तकांची भेट दिली. बाबासाहेब वाकचौरे यांनी उकिरडे, उपाध्ये परिवाराचे कौतुक करून आभार मानले.



