लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या महिलांचे मानधन सुरू करा!

महिलांचा अकोलेत भव्य मोर्चा;
अकोले,प्रतिनिधी
दि. १५ ऑक्टोबर २०२६ :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या आणि मानधन बंद झालेल्या महिलांचे मानधन तातडीने सुरू करावे, ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी आणि मानधन दरमहा १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करावे, या मागण्यांसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आज अकोले येथे हजारो महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
अकोले तालुक्यातील रासने संकुल येथून सुरू झालेल्या मोर्चाची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जनवादी महिला संघटनेच्या राज्य सचिव प्राची हतीवलेकर आणि सहसचिव प्रीती शेखर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे राज्य सचिव डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ आणि गणेश ताजणे यांनी मोर्चाला पाठिंबा दिला. सुमन विरणक, अनिता साबळे, संगीता साळवे, आराधना बोऱ्हाडे, निर्मला मांगे आणि हेमलता शेळके यांनी मोर्चासाठी मेहनत घेतली.
मानधन अचानक बंद झाल्याबद्दल महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. मोर्चानंतर तहसीलदार सिद्धार्थ मोरे आणि महिला व बालविकास अधिकारी केडर नागरे यांना निवेदन देण्यात आले. मानधन पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक महिलांनी अर्ज दाखल केले. उर्वरित महिलांचे अर्ज २२ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात येणार आहेत.

महिला घरात, शेतीत, पशुपालनात आणि काळजीवाहू कामांमध्ये वर्षभर बिनमोबदल्याचे श्रम करतात. भारतीय स्टेट बँकेच्या संशोधन विभागाच्या गणनेनुसार, महिलांच्या बिनमोबदल्याच्या घरगुती व काळजीवाहू कामाचे वार्षिक मूल्य सुमारे २२.७ लाख कोटी रुपये आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील मानधन ही सरकारची दया नसून महिलांच्या श्रमाच्या मूल्याची अंशतः परतफेड आहे, अशी भूमिका संघटनेने मांडली.
निराधार सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, विधवा, वृद्ध आणि विविध शासकीय योजनांमध्ये तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळू नये. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र श्रमिक महिलांना योजनेत समाविष्ट करावे, ६५ वर्षांवरील महिलांनाही लाभ द्यावा, जाचक अटी रद्द कराव्यात आणि बंद मानधनासह थकीत रक्कमही द्यावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.



