अहमदनगर

माजी प्राचार्य पंढरीनाथ तुकाराम हिरगळ यांचे मरणोत्तर देहदान!

श्रीरामपूर : विज्ञाननिष्ठ विचार, विवेकवादी दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी यांचा जीवनभर पुरस्कार करणारे रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले माजी प्राचार्य पंढरीनाथ तुकाराम हिरगळ यांनी मरणोत्तर देहदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन श्रीरामपूर येथे निधन झाले त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी मृत्यूनंतर त्यांचा देह लोणी येथील प्रवरा मेडिकल हॉस्पिटल ला दान केला

मृत्यूनंतरही आपला देह विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोगी पडावा, या उदात्त हेतूने त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयातून अंधश्रद्धेला फाटा देत विज्ञाननिष्ठ विचारांची कृतीतून जपणूक करण्याचा संदेश समाजाला मिळाला आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्राचार्य हिरगळ यांनी १९७१ पासून रयत शिक्षण संस्थेत अध्यापनाचे कार्य सुरू केले. त्याग, सेवा आणि समर्पण ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रुजविलेली जीवनमूल्ये अंगीकारून त्यांनी आयुष्यभर अध्यापन आणि शैक्षणिक प्रशासनाच्या माध्यमातून समाजाची सेवा केली. ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विचारावर त्यांची निष्ठा होती.

प्राचार्य हिरगळ हे केवळ शिक्षक आणि प्रशासक नव्हते, तर गणित विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारे अभ्यासू लेखकही होते. त्यांनी ‘गणिताचे गाणे’ आणि ‘गणित काव्यदर्शन’ या दोन ग्रंथांचे लेखन केले. हिंदी प्रवीण परीक्षेत त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटविली. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी घडले. त्यांच्यापैकी अनेक जण डॉक्टर, प्राध्यापक, वकील आणि शास्त्रज्ञ म्हणून विविध क्षेत्रांत कार्यरत झाले. विद्यार्थ्यांच्या यशातच आपल्या कार्याचे सार्थक मानणारे ते समर्पित शिक्षणतज्ज्ञ होते.

त्यांच्या कुटुंबातही शिक्षणाचा वारसा जपला गेला आहे. त्यांच्या पत्नी प्रा. सुशीला पंढरीनाथ हिरगळ, मुलगा प्राध्यापक संदीप पंढरीनाथ हिरगळ, मुलगी प्राध्यापक जयश्री बाबासाहेब शेंडगे आणि जावई प्रो. डॉ. बाबासाहेब शेंडगे हे प्राध्यापक असून, त्यांची सून प्रमिला संदीप हिरगळ शिक्षण विस्तार अधिकारी एक भाऊ पांडुरंग हिरगळ प्राथमिक शिक्षक दुसरा छोटा भाऊ गजानन हिरगळ डॉक्टर, सहा बहिणी यांचे संसार फुलवले नातू चांगल्या पदावर आता कार्यरत आहे. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा वारसा त्यांनी आपल्या कुटुंबातही रुजविला.

प्राचार्य हिरगळ यांच्या जीवनातील विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रत्यय त्यांच्या देहदानाच्या निर्णयातून प्रकर्षाने येतो. मृत्यूनंतर आपला देह अग्निसंस्कारासाठी वापरण्याऐवजी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी उपयोगी पडावा, अशी भावना त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमोर व्यक्त केली. त्यांच्या या इच्छेचे महत्त्व ओळखून कुटुंबियांनीही ती पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. विशेष म्हणजे, त्यांच्या आईच्या अपघातानंतर मिळालेली आर्थिक मदत त्यांनी देणगी म्हणून दिल्याची बाबही त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेची साक्ष देते.

देहदान म्हणजे मृत्यूनंतरही ज्ञानदानाची अखंड परंपरा जिवंत ठेवण्याचा उदात्त विचार होय. आपल्या देहाचा उपयोग वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्हावा, ही भूमिका स्वीकारून प्राचार्य हिरगळ यांनी समाजासमोर विज्ञाननिष्ठ आणि विवेकवादी आचरणाचा वस्तुपाठ ठेवला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे देहदानाविषयी जनजागृती होण्यास मदत होईल आणि अंधश्रद्धा व अनावश्यक रूढींना छेद देणाऱ्या विचारांना बळ मिळेल.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा आयुष्यभर जपणाऱ्या प्राचार्य पंढरीनाथ तुकाराम हिरगळ यांनी देहदानातूनही समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. त्यांचे जीवनकार्य आणि देहदानाचा निर्णय हे शिक्षण, विज्ञाननिष्ठा, मानवता आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम आहे. त्यांच्या या कृतीतून ‘मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडावे’ हा प्रेरणादायी संदेश समाजाला मिळतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button