तहानलेल्या पशुपक्ष्यांसाठी पर्यावरणप्रेमी युवकाचा जीवनदायी पाणवठा!

अकोले प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या कडक झळांनी सध्या संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघत असताना, माणसांसोबतच पशुपक्ष्यांचे जीवनही अत्यंत कठीण बनले आहे. पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या पक्ष्यांचे हाल, तहानलेले प्राणी आणि कोरड्या पडलेल्या जागा पाहून मन हेलावून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण काळात मवेशी येथील पर्यावरणप्रेमी युवक राहुल राऊत यांनी संवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण घालत स्वतःच्या श्रमदानातून पशुपक्ष्यांसाठी जीवनदायी पाणवठा उभारून एक प्रेरणादायी कार्य केले आहे.
पाण्याच्या अभावामुळे त्रस्त झालेल्या पक्ष्यांचे हाल पाहून राहुल राऊत यांचे मन अस्वस्थ झाले. कोणत्याही मदतीची अपेक्षा न ठेवता आणि कोणाचीही वाट न पाहता त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. हातात फावडा घेत त्यांनी स्वतः खड्डा खोदून एक छोटा पण अत्यंत उपयुक्त असा जलतळ तयार केला. या जलतळामुळे आज अनेक पक्षी, खारी, तसेच इतर लहान प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचा आधार मिळत असून, त्यांच्या जीवनाला नवसंजीवनी मिळाली आहे.
मवेशी परिसरातील मारुती मंदिर परिसर तसेच उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये यापूर्वीच राहुल राऊत यांनी १०५ झाडांचे वृक्षारोपण केले होते. त्यांच्या या हरित उपक्रमामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर जीवसृष्टीचा वावर वाढला. मात्र वाढत्या उन्हामुळे या पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित कृती करत जलतळ उभारण्याचा निर्णय घेतला.
सुमारे सात ते आठ फूट आकाराचे व कमी खोलीचे हे तळे पूर्णपणे श्रमदानातून तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या तळ्यात नियमित पाणी भरून ठेवले जात असून, त्यामुळे पशुपक्ष्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय सहजपणे पाणी पिता येते. या तळ्यांचा पशुपक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असून, परिसरात पुन्हा जीवन फुलताना दिसत आहे. सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी पक्ष्यांची किलबिल, खारींची वर्दळ आणि प्राण्यांची हालचाल पाहायला मिळत असून, निसर्गाशी जुळलेले एक सुंदर, सजीव चित्र येथे निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, राहुल राऊत यांनी आतापर्यंत ११५० पेक्षा अधिक झाडांचे वृक्षारोपण करून ती जगवण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था अशा विविध उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याची दखल परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात घेतली जात आहे. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेमुळे नागरिक भावूक झाले असून, समाजात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश पसरत आहे. यावेळी राहुल राऊत म्हणाले,

“पशुपक्षी जगले तरच पर्यावरण टिकेल आणि पर्यावरण टिकले तरच मानवजातीचे भविष्य सुरक्षित राहील. प्रत्येकाने आपल्या परीने छोटासा प्रयत्न केला, तरी मोठा बदल घडू शकतो.”
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने आपल्या घराजवळ, शेतात किंवा मोकळ्या जागेत पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे, तसेच शक्य असेल तिथे छोटे पाणवठे तयार करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याअभावी त्रस्त होणाऱ्या पक्ष्यांसाठी मवेशी येथील पर्यावरणप्रेमी राहुल राऊत यांनी झाडावर छोट्या भांड्यात पाणी ठेवून एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
नारळाच्या करवंटीमध्ये पाणी भरून झाडावर सुरक्षितपणे ठेवण्यात आले असून, त्यामुळे पक्ष्यांना सहजपणे पाणी पिण्याची सोय झाली आहे. या उपक्रमामुळे परिसरात पक्ष्यांचा वावर वाढताना दिसत आहे.
उन्हाळ्यात अशा छोट्या प्रयत्नांमुळे अनेक पक्ष्यांचे प्राण वाचू शकतात, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
“प्रत्येकाने आपल्या घराजवळ पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे,” असे आवाहन राहुल राऊत यांनी केले आहे.



