मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानंतर सिंहगड कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन. धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित

उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानंतर
पुणे, दि. 4 सप्टेंबर : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 20 महिन्यांहून अधिक काळाचे वेतन थकीत असल्याच्या गंभीर प्रश्नावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर दि. 5 सप्टेंबर, शिक्षक दिनी मंत्री पाटील यांच्या निवासस्थानासमोर आयोजित करण्यात आलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. अशी माहीती भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी सांगीतले
या बैठकीस भारतीय मजदूर संघ अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सागर पवार, अनिकेत जाधव, औदुंबर ताठे, शुभम फालके उपस्थित होते
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत, “सिंहगड संस्थेतील कर्मचाऱ्यांना निश्चितच न्याय देण्यात येईल,” असे आश्वासन दिल्याची माहिती भारतीय मजदूर संघाने दिली. या प्रश्नावर संबंधित सर्व पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक दि. 13 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
भारतीय मजदूर संघाने स्पष्ट केले की, आंदोलन स्थगित करणे ही माघार नसून शासनाच्या आश्वासनाच्या अंमलबजावणीसाठी आणि प्रश्नाच्या सकारात्मक तोडग्यासाठी दिलेली संधी आहे. भारतीय मजदूर संघाने या बाबतीत त्रिपक्षीय बैठकीत सकारात्मक भूमिका न घेतल्यास या संस्थावर प्रशासक नेमण्यात यावा, व शासन मान्यता काढून घेऊन कामगारांना न्याय देण्यात यावेत. अशी ठाम निर्धार बाळासाहेब भुजबळ यांनी स्पष्ट केले आहेत
सिंहगड संस्थेतील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 20 महिन्यांहून अधिक काळाचे वेतन प्रलंबित असून, त्यामुळे अनेक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 13 कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवल्याचा गंभीर आरोप भारतीय मजदूर संघाने केला आहे.
कर्मचारी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ थकीत वेतन, पी.एफ. आणि इतर न्याय्य हक्कांसाठी आंदोलन व सत्याग्रह करीत आहेत. सन 2016 पासून पी.एफ. संदर्भातील अनियमितता, पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार संपूर्ण वेतनाचा लाभ, प्रलंबित 56 टक्के महागाई भत्ता तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन व वैध सेवा निवृत्ती लाभ हे प्रमुख प्रश्न असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
भारतीय मजदूर संघाने शासनाकडे 20 महिन्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्यासह सर्व प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक प्रश्नांवर कालबद्ध निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
दि. 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत ठोस आणि न्याय्य निर्णय झाला नाही, तर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करून अधिक तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.


