इतर

दरेवाडी(इगतपुरी )शाळेत शिक्षण परिषद दिमाखात संपन्न

इगतपुरी :- भाम धरणाच्या कुशीत विलोभनीय निसर्गाने नटलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी येथे नुकतीच शिक्षण परिषद उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. प्रतिकूल परिस्थिती, भौगोलिक दुर्गमता आणि मर्यादित संसाधने असूनही शाळा व्यवस्थापन व शिक्षकांच्या सुंदर समन्वयातून ही परिषद उपस्थितांसाठी विशेष प्रेरणादायी ठरली. प्रस्तुत परिषदेच्या सुरूवातीला शाळेतील विद्यार्थिनींनी पारंपारिक आदिवासी पेहरावात उपस्थितांचे औक्षण करून सहर्ष स्वागत केले.

त्यानंतर मुख्याध्यापक संजय गातवे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोबतीने हार्मोनियमवर तालबद्ध स्वागतगीत सादर केले. हे गीत ऐकून सर्वच मंत्रमुग्ध झाले. यानंतर सहशिक्षक महेश खैरनार यांनी आपल्या सुरमयी आवाजात “शोधिसी मानवा” हे ईशस्तवन गावून उपस्थितांची मने जिंकली‌. तदनंतर शाळेच्या उपक्रमशील आयडाॅल शिक्षिका श्रीमती वंदना सोनार यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सादर केलेल्या प्रास्ताविकातून दरेवाडी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तापूर्ण वाटचालीच्या यशोगाथेची वास्तववादी मांडणी केली. प्रस्तुत परिषदेतील तज्ञ सुलभक जनार्दन केकरे यांनी क्षेत्र भेटीचे नियोजन व महत्त्व, कमलेशकुमार शिरोडे यांनी निपुण भारत अंतर्गत भाषा आकलनयुक्त वाचन, दत्तू साबळे यांनी गुणाकाराची सोपी तंत्रे, जितेंद्र भदाणे यांनी शाळा व्यवस्थापन समिती व लोकसहभागाचे महत्त्व या घटकांवर तांत्रिक कौशल्यांचा वापर करून अभ्यासपूर्ण शैक्षणिक सत्रे घेतली. या संदर्भात भरवज शाळेचे मुख्याध्यापक दगडूसिंग परमार यांनी परिषदेसाठी स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

शेवटी परिषदेचे अध्यक्ष व काळुस्ते केंद्राचे केंद्र समन्वयक निशांत पगार यांनी प्रशासकीय विषयांचा सखोल आढावा घेतला. तसेच परिषदेचे आदर्शवत नियोजन केल्याबद्दल टीम दरेवाडीचे अभिनंदन केले. या दरम्यान दरेवाडी शाळेकडून उपस्थित गुरुजनांना सुरुची भोजन देण्यात आले. अतिशय खडतर परिस्थितीत समर्पित भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणारे दरेवाडी शाळेतील शिक्षक संजय गातवे, महेश खैरनार व श्रीमती वंदना सोनार यांचा केंद्रातील शिक्षकांकडून विशेष गौरव करण्यात आला. मासिक परिषदेची सांगता सामुदायिक वंदे मातरम् गायनाने व “जय दरेवाडी” या घोषवाक्याने झाली. अशा प्रकारे अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या शैक्षणिक परिषदेसाठी दरेवाडी शिक्षक चमूचे इगतपुरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब मुंढे व शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मंजुषा साळुंखे यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button