निवडणुकांच्या तोंडावर लाडक्या बहिणींची नाराजी टाळण्यासाठी ‘ई-केवायसी’ ला तूर्तास ब्रेक

सोलापूर, दि. 22 विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही.
त्यामुळे लाडक्या बहिणींची ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया तूर्तास थांबविली आहे. ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. १५ ऑक्टोबर २०२४ च्या मुदतीत राज्यभरातून दोन कोटी ५६ लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले. पण, सहा महिन्यांनी निकषांवर
बोट ठेवत योजनेच्या लाभार्थीची पडताळणी सुरू झाली. पहिल्यांदा चारचाकी वाहने असलेल्या महिला, केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनांचेबलाभार्थी, सरकारी नोकरदार महिला, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिलांचा शोध घेण्यात आला. याशिवाय चुकीचे वय दाखवून किंवा वय कमी-अधिक असताना देखील योजनेचा
लाभ घेणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश होता. पडताळणीनंतर राज्यातील सुमारे ४५ लाख महिलांना लाभ मिळालेला नाही.
आता ‘ई-केवायसी’तून ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त आहेत, त्यांचा शोध घेतला जाणार आहे. या निकषांनुसार राज्यभरातील ७० लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील, अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. लाभ मिळालाच नाही सरकारच्या शासन निर्णयानूसार उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार महिला लाभार्थी, मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली. मात्र अजूनही त्याचा लाभ मिळाला नाही, त्यात ई-केवायसी बंधनकारक असल्याने महिलांची नाराजी वाढत आहे.



