नेवासा तालुक्यात 146 कोटी नुकसान भरपाई मंजूर! :

जीवन ज्योत फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश
नेवासा प्रतिनिधी|
नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे 2025 मधील अतिवृष्टी नुकसान भरपाई ला अनेक आठवडे उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईचा एकही रुपया जमा होत नव्हता. पंचनामे पूर्ण, याद्या जाहीर—सर्व प्रक्रिया संपली; पण प्रशासन मात्र “फाईल हलवायची तर उद्या, निर्णय घ्यायचा तर नंतर” अशा पद्धतीने ढिसाळ कामगिरी करत होते.शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था ढासळत असताना तहसील कार्यालयातील निष्क्रियता ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष की अकार्यक्षमता? असा प्रश्न चर्चेत आला होता. शेती हंगाम डोळ्यांसमोर येत असताना शेतकरी भरपाईची वाट पाहत होते आणि प्रशासन मात्र राजरोसपणे वेळकाढूपणा करत होते.
ही परिस्थिती ओळखून जीवन ज्योत फाऊंडेशन पुढे सरसावले. संघटने ने तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांचा आकडा, पंचनामा तपशील आणि नुकसानभरपाई प्रक्रियेतील विलंबाचे पुरावे गोळा करून तहसीलदार व पोलीस प्रशासनाला ठोस निवेदन सादर केले.
निवेदनात प्रशासनाला खडसावत स्पष्ट सांगण्यात आले—
“चार दिवसांत वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा झाली नाही, तर तहसील कार्यालयात अर्धनग्न आंदोलन उभे राहील. परिस्थिती बिघडली तर त्याची थेट जबाबदारी प्रशासनाची!”
या इशाऱ्याने तहसील कार्यालयात खळबळ उडाली. अनेक दिवस धूळ खात पडलेल्या फाईलींना अचानक गती मिळाली. कर्मचाऱ्यांनी तातडीने नावांची तपासणी सुरू केली.
आणि अखेर—नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यासाठी 146 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांचे पैसेही टप्प्याटप्प्याने जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.स्थानिक नागरिकांमध्ये आनंद व समाधानाची भावना असून, शेतकरी बांधवांनीही जीवन ज्योत फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले आहेत. फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच प्रशासनाला धडपड करावी लागली, हे स्पष्टपणे दिसून आले.ज्यांनी पुढाकार घेतला त्यात कमलेश नवले पाटील, प्रदेशाध्यक्ष नरेंद्र नवथर (सर), राहुल कांगुणे, अक्षय बोधक, आप्पासाहेब अरगडे, अभिजीत बोधक यांचा समावेश होता. या टीमने सातत्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद ठेवला. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हे यश मोठे आहे—
कारण हे फक्त नुकसानभरपाईचे पैसे नाहीत, तर शेतकऱ्यांच्या संघर्षाला मिळालेला न्याय आहे.



