योगगुरू बाबा रामदेव यांच्या शुभहस्ते बोरिबेल (ता दौंड )येथे पार पडला ‘राष्ट्रीय ग्रामविकास प्रशिक्षण केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा!

संजय उकिरडे
दिनांक १२ मार्च २०२६
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरिबेल येथे सुमारे २०० एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या ‘एमआयटी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’ (MIT Life Transformation Centre) आणि राष्ट्रीय ग्रामविकास प्रशिक्षण केंद्रा चा भव्य उद्घाटन सोहळा योगगुरू पूज्य बाबा रामदेवजी यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन संवाद साधला.हा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षण ठरला, ज्यामुळे ग्रामविकास, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सशक्तीकरण आणि युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाला नवीन दिशा मिळेल. हे केंद्र भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील एक अभिनव उपक्रम आहे, जो MIT World Peace University (MIT-WPU) च्या वतीने उभारण्यात आले आहे. येथे विद्यार्थ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकनियुक्त प्रतिनिधींना (सरपंच, ग्रामसेवक इ.) योग, अध्यात्म, शिस्त, नेत्यत्व आणि ग्रामविकास यांचा समन्वय साधून प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येईल. केंद्राचा मुख्य उद्देश सरपंच, उपसरपंच,सदस्य यांच्या सह युवक-युवतींमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, पर्यावरण जागृती आणि राष्ट्रनिर्माणाची भावना रुजवणे हा आहे.
उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ चे प्रमुख पदाधिकारी, १८०० हून अधिक सरपंच, तसेच ‘महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन’ चे पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व ७०० ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसह एमआयटी शिक्षणसंस्थेतील विविध शाखांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
राष्ट्रीय सरपंच संसदे चे राष्ट्रीय अध्यक्ष व मुख्य समन्वयक श्री. योगेश पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सरपंचांच्या उपस्थितीसाठी उत्कृष्ट नियोजन केले होते. याकामी श्री. प्रकाश महाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सोहळ्यात राष्ट्रीय सरपंच संसदे च्या विविध उपक्रमांचा आणि विस्तृत सरपंच संघटन कार्याचा विशेष गौरव करण्यात आला.
सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे योगगुरू रामदेव बाबाजी यांच्या हस्ते श्री. योगेश पाटील यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय सरपंच संसदेचे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक म्हणून त्यांच्या योगदानाची दखल घेतली गेली. हा सन्मान सत्कार श्री. योगेश पाटील यांनी सर्व प्रती निधी यांच्या वतीने नम्रतेने स्वीकारला. या गौरवामुळे राष्ट्रीय सरपंच संसदे च्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर विस्तारण्याची प्रेरणा मिळाली आहे, अशी भावना श्री. योगेश पाटील तसेच उपाध्यक्ष व सहसमन्वयक श्री. प्रकाश महाले यांनी व्यक्त केली.
हा कार्यक्रम केवळ एक उद्घाटन नव्हता, तर ग्राम भारताच्या सशक्तीकरणासाठी आणि युवा पिढीच्या जीवन परिवर्तनासाठी एक नवा अध्याय सुरू होण्याचा क्षण होता. योग, ग्रामविकास आणि शिक्षण यांचा सुंदर संगम साधणाऱ्या या केंद्रामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला नवीन दिशा मिळेल असे मत राष्ट्रीय सरपंच संसदेचे राज्य समन्वयक डॉ. नामदेव गुंजाळ यांनी व्यक्त केले.



