वाकी ता अकोले येथे शेतकऱ्यांना गहू व हरभरा लागवड प्रशिक्षण

समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत ए.एस.के. फाऊंडेशन, व बायफ चा पुढाकार
एस के जाधव
वाकी (ता. अकोले), 19 नोव्हेंबर 2025
ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत व बायफ (BISLD), नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत वाकी येथे गहू व हरभरा लागवड विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना हरभरा बियाणे तसेच बीजप्रक्रियेसाठी रायझोमिका बायोफर्टिलायझरचे वाटप करण्यात आले. गहू व हरभरा पिकांची निवड, पेरणीची योग्य वेळ, जमिनीची मशागत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग-किड नियंत्रण, तणनियंत्रण ते काढणीपर्यंतची सर्वसमावेशक माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. हे मार्गदर्शन बायफचे श्री. राम कोतवाल व श्री. विष्णू चोखंडे यांनी केले.

रणद खुर्द, रणद बुद्रुक, वाकी, भंडारदरा, गुहिरे व कोलटेंभे या गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनचे श्री. सिद्धार्थ अय्यर, श्री. अरुण बांबळे, तसेच बायफचे श्री. प्रदीप खोसे, श्री. सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या आयोजानात बायफचे राम कोतवाल, विष्णू चोखंडे, संदीप काकड, मच्छिंद्र मुंढे, मारुती सगभोर, काजल देशमुख यांनी सहभाग घेतला.
समृद्ध किसान प्रकल्प आणि ग्राम विकास समितीच्या मदतीने या वर्षी वाकी, भंडारदरा, रणद खुर्द, रणद बुद्रुक, गुहिरे व कोलटेंभे या गावांमधील 100 शेतकऱ्यांना गहू(फुले समाधान) बियाणे, तर 100 शेतकऱ्यांना हरभरा(विजय) बियाणे व औषधे देण्यात आली.
——–



