पुणे–नाशिक रेल्वे मार्ग रद्द झाल्याच्या निषेधार्थ चंदनापुरी गटातील ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

संगमनेर, दि. १८ जुलै : केंद्र व राज्य सरकारने पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द केल्याच्या निषेधार्थ आज चंदनापुरी जिल्हा परिषद गटातील विविध गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी पुणे–नाशिक दरम्यान सरळ मार्गाने रेल्वे प्रकल्प तातडीने मंजूर करून कामाला सुरुवात करावी, अशी ठाम मागणी केली. या रेल्वेमुळे संगमनेर तालुक्यासह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार असून रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि वाहतूक क्षेत्राला मोठा फायदा होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यापूर्वी देवगाव ग्रामस्थांच्या वतीनेही याच मागणीसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्या आंदोलनानंतर आता चंदनापुरी जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांनीही एकत्र येऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुणे–नाशिक रेल्वेच्या मागणीसाठी जनआंदोलन अधिक व्यापक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आंदोलनाची सांगता झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी, संगमनेर यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. केंद्र व राज्य शासनापर्यंत जनतेच्या भावना आणि मागण्या तातडीने पोहोचवाव्यात, तसेच पुणे–नाशिक सरळ मार्गावरील रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन पुणे–नाशिक सरळ मार्गावरील रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र व व्यापक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

या आंदोलनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनुसार, तसेच सर्व गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार या आंदोलनाचा पुढील टप्पा हा 1 ऑगस्ट रोजी संगमनेर बस स्थानक समोर रस्ता रोको केला जाणार आहे.
यावेळी विविध गावातील गावकरी उपस्थित होते
यामध्ये देवगावहून रवींद्र लामखडे, संजय देशमुख प्रमोद शिंदे, अविनाश देशमुख संतोष शिंदे, खांडगाव येथून दत्ता ढगे, शुभम शिंदे, पेमगिरी चे सरपंच सोमनाथ गोडसे, दत्तू कोकणे घारगाव येथून शिवसेनेचे नेते जनार्धन आहेर, बाप कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे, मालुंजे येथून महेश घुगे, समनापुर येथून देवा शर्माळे, इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते



