इतर

नेप्तीत सावता महाराज पुण्यतिथीचा सप्ताह उत्साहात संपन्न; काल्याच्या कीर्तनाने सांगता

अहिल्यानगर, प्रतिनिधी :

नगर तालुक्यातील नेप्ती येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत सावता महाराज तरुण मंडळ, माळी समाज व नेप्ती ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह मंगळवारी काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला

रविवार दि. 9 ऑगस्ट ते मंगळवार दि. 11 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या या धार्मिक सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. सप्ताहाचे उद्घाटन ह.भ.प. शिवचरित्रकार आकाश महाराज फुले यांच्या हस्ते वीणा पूजनाने झाले होते. तीन दिवस दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत हरिपाठ आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अनुष्का दिदी जाधव, ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था, नेप्ती यांनी किर्तन केले. दुसऱ्या दिवशी ह.भ.प. श्री शंकर महाराज लोखंडे, कोल्हार खुर्द, गणेशवाडी यांचे रसभरीत किर्तन झाले. मंगळवारी सप्ताहाच्या सांगता दिनी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. शिवचरित्रकार आकाश महाराज फुले यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था व नेप्ती भजनी मंडळ यांनी तीनही दिवस साथसंगत दिली.काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. शांततेत आणि भक्तिभावात पार पडलेल्या या सप्ताहामुळे नेप्ती गाव पुन्हा एकदा वारकरी संस्कृतीने न्हाऊन निघाले.



Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button