शेणित येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा .

प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव.
शेणीत : दि.11 राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय, जि.प.प्राथमिक शाळा ठोकळवाडी, डॉ.राजेंद्र प्रसाद प्राथमिक,माध्यमिक आश्रम शाळा, जि. प. प्राथमीक शाळा गावठा, जि.प. प्राथमीक शाळा डामसेवाडी, क्रांती प्रतिष्ठान व ग्रामपंचायत शेणीत यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शेणीत परिसरातील सर्व शाळेचे विद्यार्थी तळपेवाडी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकत्र आले. त्यानंतर वाजत गाजत मिरवणूक नळावणेवाडीतून शेणीत गावठा येथे मंदीरात सभा संपन्न झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे आदिवासी पोशाख परिधान केले होते. लेझीम,नृत्य,कलाविष्कार विद्यार्थ्यांनी पावसातही जोशात सादर केले.
मंदीराच्या सभा मंडपात सदर कार्यक्रम संपन्न झाला.आदिवासी क्रांतीकारक राघोजी भांगरे, भगवान बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन करून अभिवादन केले.
क्रांती प्रतिष्ठान यांच्यातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. श्री किशोर पवार हे होते. सरपंच श्री गोविंद कोंडाजी करवंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय व डॉ. राजेंद्र प्रसाद आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी समूह नृत्य सादर करत आदिवासी संस्कृतीचा आगळा – वेगळा अनुभव दिला. गावातील श्रेष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करताना बक्षिसांचा वर्षाव केला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किशोर पवार विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले,” विद्यार्थ्यांनो, पावसातही तुम्ही तुमचा उत्साह टिकवून ठेवला.त्यामुळे आम्हीही आमची ड्यूटी पावसात बजावण्याची उर्मी येते. राजूर पोलीस स्टेशन अंतर्गत 80 गावे आहेत मलाही वाटतं सर्व गावांना भेटी द्याव्या परंतु ते शक्य होत नाही. या ग्रामीण भागात आई वडील तुम्हाला शाळेत पाठवतात तेव्हा शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास पूर्ण केला पाहिजे. उच्च पदावर जाण्यासाठी प्रत्येक स्टेप वरती चढत गेले पाहिजे. शिकण्यासाठी आपल्या मनाची तयारी ठेवावी. मी सुद्धा तुमच्यासारखे खेड्यात शिक्षण घेतले गरिबीतून शिकलो. आठवडी बाजारात आई-वडिलांबरोबर भाजी विकली. मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड ठेवू नका. कुणालाही अचानक मोठे होता येत नाही त्यासाठी कष्टाची तयारी ठेवावी लागते.

तुम्ही उद्याचे नागरिक आहात. पंतप्रधान, मुख्यमंत्री, डॉक्टर, वकील,इंजिनियर, आयपीएस, सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले पाहिजे. ते स्वप्न साकार करण्यासाठी मनात सकारात्मकता ठेवली पाहिजे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यशस्वी करण्यासाठी स्वप्न बघा आणि ते साक्षात उतरवण्यासाठी तयारी ठेवा, प्लॅनिंग करा.मेणबत्ती जळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. त्याप्रमाणे शिक्षक तुम्हाला अभ्यासाची चेतना देण्याचे काम करतात. आपण फक्त प्रयत्न केला पाहिजे जे तुम्हाला येत नाही ते शिक्षकांना विचारले पाहिजे. शिक्षकांमुळेच मी घडलो म्हणून शिक्षकांचे ऋण कधीच विसरायचे नाहीत. शिक्षकांबरोबर आई-वडिलांचा आदर्श घेत जा . आदर राखत जा. आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. आपणही अभ्यासाची क्रांती घडवून दाखवा मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांना अभिमान वाटला पाहिजे.
आज पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करताना दिसत आहेत. अति दुर्बल घटकांना प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण असते त्या आरक्षणाचा आपण फायदा घेतला पाहिजे. आपल्याला काय बनायचं आहे ते ठरवा त्यानुसार कृती करा. यश तुमच्याच हातात आहे. वेळेला महत्त्व द्या. अभ्यासाबरोबर व्यायाम आणि खेळ शरीराला सक्षम बनवतं. तुम्ही सुद्धा असं काहीतरी करून दाखवा. असे सांगितले

यावेळी क्रांती प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री नागेश धोंगे, सचिव श्री नामदेव धोंग, देवगाव सोसायटीचे चेअरमन श्री पुनाजी पांडुरंग लोहकरे, श्री भगवंता घाटकर, पोलीस पाटील श्री रामदास हनुमंता धोंगडे, मुख्याध्यापक बाळासाहेब चौधरी, मुख्याध्यापक युवराज गभाले, मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर, मुख्याध्यापक सुधाकर भांगरे, मुख्याध्यापक सोंगाळ तसेच अंबादास जोरवेकर गौतम वैराळ श्री घनश्याम नवले महादर्पणचे प्रतिनिधी श्री संतु जाधव, श्री तुकाराम बेनके, मुख्याध्यापक श्री कवटे सर, श्री एकनाथ शिंदे, श्री विष्णू कुलाळ, श्री ज्ञानेश्वर घाटकर, श्री राम बिडवे, श्री विठ्ठल बिडवे, श्री संतोष कातडे, श्री गुरुनाथ साबळे, श्री मोहन गभाले, श्री संतोष धोंगडे, श्री रवी धोंगडे, श्री यादव भागीत, श्री शांताराम घाटकर, श्री संजय धिंदळे, राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री पथवे, श्री गोंधे, होमगार्ड श्री लेंडे उपस्थित होते.
क्रांती प्रतिष्ठान संचालित मातोश्री गोदाबाई धोंगे कॉलेज ऑफ नर्सिंग खंबाळे तालुका इगतपुरी /राजुर ता.अकोले जि. अहिल्यानगर यांनी सर्व विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना खिचडी भाताचे जेवण दिले.
याप्रसंगी श्री पुनाजी पांडुरंग धोंगडे यांनी सूत्रसंचालन केले व मुख्याध्यापक श्री बाळासाहेब चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


