अहमदनगर

नेप्तीत ‘महाविस्तार एआय ॲप’चा जागर :

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा- कृषी अधिकारी नवले , .

. शेतीच्या निर्णयांना मिळणार तंत्रज्ञानाची साथ

अहिल्यानगर : प्रतिनिधी

-नगर तालुक्यातील नेप्ती येथील शेतकऱ्यांना शेतीतील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेताना अचूक आणि वेळेवर माहिती मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हवामानातील बदल, पिकांवरील रोग-किडींचा प्रादुर्भाव, बाजारभावातील चढ-उतार आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याबाबतची माहिती शेतकऱ्यांच्या हातात सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी गावागावांत ‘महाविस्तार दिवस’ साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी अशोक वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली नेप्ती येथे ‘महाविस्तार एआय ॲप’ डाऊनलोड करून देत शेतकरी व ग्रामस्थांमध्ये ॲपच्या वापराबाबत जनजागृती करण्यात आली. .

आजच्या काळात शेती केवळ अनुभवाच्या जोरावर न करता उपलब्ध तंत्रज्ञान, माहिती आणि शास्त्रीय मार्गदर्शनाच्या आधारे करणे ही काळाची गरज आहे. पिकाची निवड, पेरणीची वेळ, पिकांवरील रोग-किडींचे व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, बाजारपेठेतील परिस्थिती अशा अनेक बाबींचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य माहिती मिळणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘महाविस्तार एआय ॲप’च्या माध्यमातून ही माहिती शेतकऱ्यांच्या मोबाईलपर्यंत पोहोचविण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेकडे केवळ एक ॲप म्हणून न पाहता, आपल्या शेतीसाठी उपलब्ध झालेले आधुनिक मार्गदर्शनाचे साधन म्हणून त्याचा वापर करून राणी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन सहाय्यक कृषी अधिकारी रावसाहेब नवले यांनी केले

नवले साहेब पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांना अनेकदा हवामान, बाजारभाव किंवा पिकांशी संबंधित समस्यांबाबत तातडीने माहितीची गरज भासते. अशा वेळी माहिती मिळण्यात होणारा विलंब शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरू शकतो. मोबाईलच्या माध्यमातून आवश्यक माहिती सहज उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना परिस्थितीनुसार निर्णय घेणे अधिक सोपे होईल. ‘महाविस्तार एआय ॲप’चा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा. गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कृषी मित्रांनी प्रयत्न करावेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेती अधिक ज्ञानाधारित, नियोजनबद्ध आणि सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

‘महाविस्तार एआय ॲप’च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पिकांबाबत मार्गदर्शन, हवामानाची माहिती, बाजारभाव तसेच विविध कृषीविषयक बाबींची माहिती मोबाईलवर मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक माहिती वेळेवर मिळून शेतीविषयक निर्णय घेणे अधिक सुलभ होणार आहे.
यावेळी नेप्तीचे सरपंच संजय अशोक जपकर, उपकृषी अधिकारी अश्विनी भुजबळ, सहाय्यक कृषी अधिकारी रावसाहेब नवले, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, कृषी मित्र अजय कर्डिले, रामदास कल्हापुरे, अरुण बेल्हेकर, आदिनाथ होळकर, अरुण पाचारणे, कैलास पाचारणे, बाबासाहेब रावळे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. . . . . . .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button